धाराशिव (प्रतिनिधी)- बांगलादेश मध्ये मागील काही दिवसांपासून हिंदू बंधू-भगिनींवर व 70 वकीलांवर प्रचंड अन्याय अत्याचार व खोट्या केसेस सुरू आहेत. या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालून या हिंदू बांधवांना तत्काळ न्याय द्यावा. भारत सरकारने त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेऊन तातडीने पावले उचलावीत. या प्रमुख मागणीसाठी धाराशिव शहरात 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की भारता शेजारील बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अराजक परिस्थितीत तेथील हिंदू बांधवांवर प्रचंड अन्याय अत्याचार सुरू आहेत. तेथील हिंदू बांधवांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून ते बंद व्हावे, यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा. या विषयात तात्काळ पावले उचलावीत. या प्रमुख मागणीसाठी 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत.
70 वकीलांवर खोट्या केसेस
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲड. पारिजात पांडे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन यांना पत्र देवून बांगलादेशमधील अल्यसंख्यांक हिंदूवर होत असलेल्या अत्याचार व तेथील 70 वकीलांवर दाखल केलेल्या खोट्या केसेस आणि चिन्मय कृष्णदास यांच्यावर केलेल्या अत्याचार संदर्भात आवाज उठवला आहे. बांगलादेशात कायदेशीर मदत मिळण्यासाठी बांगलादेश बार कौन्सिलच्या चेअरमन यांना व कॉमनवेल्थ लॉयर असोसिएशन यांना विनंती करण्याचे पत्र पांडे यांनी लिहिले आहे. पांडे यांच्या पत्राची बार कौन्सिल ऑफ इंडियाने दखल घेतली आहे.