धाराशिव (प्रतिनिधी)- जनसंपर्काच्या माध्यमातून मतदारांशी जोडलेली नाळ, साधेपणा, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे पटवून देण्यात आलेले यश, सातत्याने पडलेल्या सोयाबीन दराचा लावून धरलेला मुद्दा, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा, निष्ठावानची प्रतिमा रूजविण्यात आलेले यश, महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांची लाभलेली प्रामाणिक साथ या जोरावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कैलास पाटील यांनी 36 हजार 500 मताधिक्य मिळवित मोठा विजय मिळविला आहे. 

विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीने मुसंडी मारली आहे. मात्र उस्मानाबाद मतदारसंघात महायुतीला यश मिळविता आले नाही. महायुतीची व्हूरचना सुरूवातीपासूनच चुकत गेली. कैलास पाटील यांची उस्माबादची उमेदवारी पूर्वीपासूनच निश्चित मानली जात होती. मात्र महायुतीचा उमेदवार अखेरपर्यंत निश्चित होत नव्हता. कुठल्या पक्षाकडे उमेदवारी जाणार, हे देखील निश्चित झाले नव्हते. भाजपमधून शिवसेनेत (शिंदे गट) आलेल्या अजित पिंगळे यांना ऐनवेळी शिवसेना कोट्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

दुसरीकडे पाटील आणि ओमराजे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केलेली होती. ओमराजे आणि पाटील यांचा शेवटच्या स्तरापर्यंत असलेला दांडगा जनसंपर्क कामी आला. कैलास पाटील यांनी शेतकरी प्रश्नांवर जोर देवून सोयाबीनच्या पडलेल्या दराचा मुद्दा प्रचारात शेवटपर्यंत लावून धरला. याशिवाय ठाकरे यांच्याशी निष्ठावान राहिल्याच्या मुद्यानेही मतदारांमध्ये पाटील यांच्याविषयीची आपुलकी राहिली. शांत स्वभाव, मतदारांसाठी सहज उपलब्धता या गोष्टीही मतदारांना भावल्या. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मतदारांमधील प्रतिमा आणि त्यांनी घेतलेले कष्ट, याचाही पाटील यांना मोठा लाभ झाला. 

 
Top