तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर विधानसभा मतदार संघात उमेदवार अर्ज माघार नंतर आता लढतीचे चिञ स्पष्ट झाले आहे. आता  प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे जोमात सुरु झाली आहे.  सध्या सोशल मिडीयावर प्रचाराचा धुराळा उठला असल्याने सोशल मिडीया वरच्या प्रचारावर लक्ष ठेवणे काम निवडणुक आयोगाला डोकेदुखी ठरत आहे. यामुळे त्यांच्या कामांचा व्याप माञ वाढला आहे. वृत्तपञावर लक्ष ठेवणे, पेपरचा पुरावा कायम राहत असल्याने त्यावर निवडणूक आयोग जातीने लक्ष ठेवुन आहे. इतर ठिकाणी माञ त्यांना लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याने त्याचा पुरेपुर लाभ उमेदवार घेत आहेत.

सध्या  सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट, रिल्स यावरून प्रचाराची राळ उठली आहे. त्यात व्हाईस ओव्हर, ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून एकमेकांचे  उणे धुणे काढुन, मतांचा जोगवा तालुक्यात मागितला जात आहे. थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा वापर करायला सुरुवात केली आहे. तरी सोशल मिडीया माध्यमातून तितकसा महिला मतदारांमध्ये प्रचार करता कठीण बनले आहे. एकूणच प्रचाराला सद्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने निवडणुकांचा फिवर तापायला सुरुवात झाली आहे. निवडणूकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्राचा वापर करीत असतात.

त्यामध्ये बैठका पदयात्रा, आदींचा वापर केल्या जातो. पूर्वी गावात “ताई, बाई, आका... मारा शिक्काची धूम ठोकणारी जीप फिरायला लागली म्हणजे निवडणुकाना सुरुवात झाल्याचे चित्र रंगविले आहे. मात्र आता डिजिटल युगात उमेदवाराची प्रचाराची धुरा इव्हेंट कंपन्यानी घेतली आहे.  उमेदवारांसाठी गाणी लिहिणे- गाणे, भाषणे लिहिणे, प्रचाराचा रथ काढणे, अशी सर्वच कामे इव्हेंट कंपनी करून घेते. त्यामुळे कार्यकर्त्यांकडील ताण कमी झाला आहे. हे सोशल हॅन्डलर्स नेत्यांचे व्हिडिओ, फोटो, मेसेज लगेच व्हायरल करतात. इतकेच नव्हे तर ते ब्रॅण्डिंग करण्याचे काम करीत आहेत. सद्या गाठीभेटी, चौकात सभा घेणे यांचे महत्त्व कमी झालेले नाही, पण फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, ट्वीटर सारख्या माध्यमातून उमेदवारांचे सोशल हॅन्डलर्स पोस्ट टाकत असल्याने ते जणू प्रचारदूतच बनले आहेत.


प्रचाराचा नवा फंडा 

सोशल मीडियावर मिम्सहा प्रकार निवडणुकीत मनोरंजन आणि प्रचारासाठी प्रभावी ठरत आहे. विरोधातील उमेदवारांचे जुन्या काळातील आश्वासनाचे जुने व्हिडिओ, कात्रणे यांचा वापर करून मिम्स बनवत ते व्हायरल करून मतदारांपर्यंत पोहचले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही  बाजूच्या समर्थकांमध्ये वॉर सुरु होत आहे. काही इच्छुक उमेदवारांकडून यूट्यूबर्सवरील इंफ्लूएन्ससची मदत घेतली जात आहे. फॉलोव्हरपर्यंत पोहचण्यासाठी युट्युबर्सकडून इंटरव्यू घेतले जात आहेत. त्यामुळे अनेकांपर्यंत पोहचण्यास मदत होत आहे.


रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध

इव्हेंट कंपन्यांना नेत्याचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया हॅन्डलर्सची गरज भासते. परंतु सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य  असलेल्या लोकांची कमतरता आहे. त्यामुळे कंपन्यांकडून विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांच्या सोशल मीडिया टीमचा भाग बनून पैसे कमविण्याची संधी मिळाली आहे.

 
Top