नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर विधानसभा मतदार संघात बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतल्याने या मतदार संघातील निवडणुकीमधील उत्साह कमी झाला आहे. आता या मतदार संघात खरी लढत महयुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. धीरज पाटील या दोन पाटलांमध्येच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांना धनगर, ओबीसी तसेच वंचितचे मतदान किती मिळते यावर या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा फैसला होणार आहे.
तुळजापुर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी ऍड. धीरज पाटील यांना जाहीर झाल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जीवनराव गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन कुठल्याही परीस्थितीत आता माघार न घेता निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे निवडणुक रंगतदार, चुरशीची होणार असल्याचे दिसुन येत होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. 4 नोव्हेंबर रोजी काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बंडखोरांना समजविण्यात यश आले त्यामुळे मोठा गाजावाजा करुन उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे व जीवनराव गोरे या मातब्बर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन आपल्या तलवारी म्यान केल्या. निवडणुकीपुर्वीच निवडणुकीतुन माघार घ्यायची होती तर या दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज का दाखल केले असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
मधुकरराव चव्हाण, अशोक जगदाळे व जीवनराव गोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदार संघात आता खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.धीरज पाटील यांच्यात अतिशय चुरशीची व अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या मतदार संघात एकुण 23 उमेदवार असले तरी लढतीमध्ये महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह वंचित बहुजन विकास आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे, समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी व अपक्ष म्हणुन लढत असलेले आण्णासाहेब दराडे हे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे या धनगर, ओबीसी व वंचितचे मतदान आपल्याकडे किती वळवितात यावर या निवडणुकीमध्ये त्यांचे भवितव्य ठरणार आहे. सध्या त्यांना धनगर समाजातुन चांगला पाठिंबा मिळत आहे. या मतदार संघात धनगर समाजाचे मतदान मोठे आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद रोचकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीत रंगत आणली आहे. सोशल मीडियावर प्रचारात आघाडीवर असणारे देवानंद रोचकरी प्रत्येक्षात किती मतदान घेतात हे पाहणे गरजेचे आहे. या मतदार संघातुन अपक्ष म्हणुन लढणारे व गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासुन न थांबता दररोज प्रचार करणारे आण्णासाहेब दराडे यांना या मतदार संघातुन मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला मात्र या प्रतिसादाचे त्यांना मिळणाऱ्या मतदानात किती रूपांतर होते यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबुन आहे.
या मतदार संघाचे विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या साठी ही निवडणुक अतिशय महत्वाची व पढील काळात त्यांचे राजकीय अस्तितत्व टिकवुन ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण कांही महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचा फार मोठ्या मतांच्या फरकाने दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तीतत्व टिकवुन ठेवण्यासाठी या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांना विजयीच व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणुक अतिशय महत्वाची आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांची ही पहिलीच विधानसभा निवडणुक आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांना तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन तब्बल 53 हजारांचे मताधिक्या मिळाले होते हे मताधिक्य टिकवुन ठेवण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीला इतके मोठे मताधिक्य मिळाले त्यामुळे आपला विजय निश्चित आहे या भ्रमात त्यांनी राहु नये कारण लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीत राहत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. वास्तविक पाहता ही निवडणुक महायुती व महाविकास आघाडी या दोघांसाठी अतिशय महत्वाची आहे.