नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठ निर्विकल्प समाधीस्त राजगुरू श्री ष. ब्र. 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पुण्यस्मरणोत्सवानिमित्त दि. 7 ते 18 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अध्यात्मिक प्रवचनासह विविध धार्मिक तसेच सर्व समाजातील प्रमुख व्यक्तींचा सत्कार, गुरुमाता अमृतमहोत्सवानिमित्त तुलाभार यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.

नळदुर्ग येथील राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाला हजारो वर्षांचा जाज्वल्य इतिहास आहे. 12 व्या शतकात हे मठ बसवकल्याणचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखले जात होते. या मठात अनेक शिवशरणानी वास्तव्य केले आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे जागृत मठ आहे.

नळराजाचे धर्मगुरू म्हणुन नवलौकिक असलेल्या या मठाचे मठाधीपती शिवैक्य राजगुरू श्री शिवलिंगेश्वर, चिक्कविरेश्वर, सिद्धरामेश्वर, चन्नबसवेश्वर, निलकंठेश्वर व नागेश्वर शिवाचार्य यांच्यासह 15 जाज्वल्य विभुतींचा महान इतिहास सदभक्तांसह मानव जातीला प्रेरणा देणारे आहे. या मठाचे सध्याचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या विद्वतपुर्ण रसाळ वाणीने आपल्या भक्तांना सदमार्ग दाखवुन मठाच्या लौकीकात व वैभवात भर घातली आहे.

या मठाचे मठाधीपती राजगुरू श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांची पुण्यतिथी व नुतन मठाच्या शिलामंडपाच्या उदघाटनानिमित्त राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य मठात दि. 7 ते 18 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या मठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमानिमित्त श्री. श्री. श्री. 1008 श्रीमद रंभापुरी वीरसिंहासनाधिश्वर जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य भगवतपाद जगद्गुरूंचे नळदुर्ग येथे 55 वर्षानंतर आगमन होत असुन त्यांच्या पदस्पर्शाने नळदुर्गची भुमी पुन्हा एकदा पावन होणार असुन त्यांच्या धर्मसभेत धर्मजागृती देव, देश व धर्म अशा त्रिवेणी संगमाचा उपदेश होणार आहे.

त्याचबरोबर या कालावधीत श्री जगद्गुरू रेणुकाचार्य पंचधातु मुर्ती प्राणप्रतीष्ठापना,मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजींचा ज्यांच्या उदारी जन्म झाला त्या मातोश्री गुरुमाता धर्माभिमानी शांताबाई मडीवाळय्या हिरेमठ यांच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधुन त्यांचा अमृतमहोत्सवी तुलाभार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 50 व्या जन्मदिन सुवर्ण महोत्सवा निमित्त अक्कनबळग महिला मंडळातर्फे तुलाभार कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच नळदुर्ग येथील विविध धार्मिक कार्यक्रमात विशेषतः मठातील कार्यक्रमात भजनासह तन, मन व धनाने सहभागी होऊन अविरतपणे गेली 75 वर्षे सेवा करणाऱ्या माता -भगिनींच्या अक्कनबळग या महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त 75 वर्ष वय पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहरातील सर्व समाजातील प्रमुख व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 7 ते 9.30 या कालावधीत पार पडणार आहेत.

दि. 18 नोव्हेंबर रोजी श्रीमद वीरसिंहासिनाधीश्वर जगद्गुरू 1008 श्री. श्री. श्री. वीरसोमेश्वर शिवाचार्य महाभगवत्पाद महा संन्नीधान रंभापुरी यांचे अड्डपालखी महोत्सव सहस्त्र कुंभ व भव्य, दिव्य वाद्यवैभव समवेत नळदुर्ग शहरात संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सकाळी 11.30 वा. त्यांची धर्मसंदेश सभा संपन्न होणार आहे.या सर्व कार्यक्रमास भाविक व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधीपती श्री. ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.


 
Top