धाराशिव (प्रतिनिधी)- अरविंदनगर (केशेगांव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ ॲड. निलेश दत्तात्रय पाटील व त्यांच्या सुविय पत्नी सौ. रविना निलेश पाटील या उभयतांचे शुभहस्ते विधीवत पुजा होवुन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे हे होते.

सदर प्रसंगी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखान्याची वाटचाल ही सुरवातीपासुनच प्रतिकुल परिस्थितीतुन गेली आहे असे सांगीतले. सध्या आपल्या कारखान्यावर दोन संकटे आहेत. एक निसर्ग, या संकटामुळे पावसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागतो. दुसरे संकट सरकारचे धोरण, सरकार कोणत्याही निर्णयावर ठाम नसून सतत निर्णय बदलत असल्याने या सरकारच्या बदलत्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. साखर कारखानदारील दीर्घ कालावधीचे धोरणाची आवश्यकता असल्याचे सांगीतले. पुढे बोलतांना अरविंद यांनी सांगीतले की, आपण कारखाना हा सामुदायीक प्रपंच म्हणुन चालवतो. त्यामुळे कारखाना अडचणीत असताना सुध्दा पुढील दिशेने वाटचाल करीत आहे. सरकारने सन 2021 पासून आतापर्यंत 5 वेळा एफआरपी वाढवली आहे परंतू साखरेची विक्री किंमत वाढवली नाही. यामुळे उत्पादन खर्च व साखर किंमत याचा ताळमेळ कोठेही लागत नाही. या अशा धोरणामुळे कारखान्यांना कर्ज घेऊन एफआरपी प्रमाणे बीले चावी लागत आहेत. अशा परिस्थितीत बँकाची कर्ज देण्याची मर्यादा संपली असून कांही कारखान्यांना शासनाची थकहमी घेऊन बँकांना कर्ज वाटप करावे लागत आहे. सहकार संपवायचे दृष्टीने बंद कारखाने खाजगी कारखानदारास चालवायला देण्यात येत आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी सर्व बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशाही परिस्थितीत आपला कारखाना सुस्थितीत असून अजूनतरी आपल्याला कर्ज घेण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागत नाही.

तसेच पुर्वी लवकर परिपक्व होणाऱ्या व साखर उतारा जास्त असणाऱ्या ऊस जातीचे प्रमाण 80 ते 90 टक्के होते. यामुळे आपला साखर उतारा 13 टक्के पर्यंत येत असल्याने आपण ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला. परंतू आज लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातीचे प्रमाण 10 टक्क्यावर आल्याने या 10 ते 12 वर्षात साखर उतारा 10.50 पर्यंतच राहत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपण यावर्षी लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातीमध्ये कोसी 671 व कोव्हीएसआय 10001 या ऊस जातीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ऊस विकास योजना जाहीर केली आहे. यासाठी कारखाना नर्सरीतून उपलब्ध असलेल्या बेण्यातून रोपे तयार करून सवलतीचे दरात मागणीप्रमाणे ऊस उत्पादकांना रोपे वाटप करण्यात येत आहेत. सोबतच जे उत्पादक वैयक्तीकरित्या रोपे मागवून या ऊस जातीची 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागण करतील त्यांना हेक्टरी 5 हजार रु. अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे साखर उतारा चांगला असणाऱ्या ऊस जातीचे क्षेत्र वाढल्यामुळे रिकव्हरी जास्त मिळून ऊसाला जादा भाव देता येईल. या दोन्ही ऊस जातीचा प्रोग्राम संपल्याशिवाय इतर ऊस जातीचा प्रोग्राम काढला जाणार नाही, आपल्या भागातील को-86032 व कोव्हीएसआय 8005 या ऊस जाती मध्यम उशीरा पक्व होणाऱ्या असल्याने ऊस उत्पादन व साखर उतारा उशीराने मिळत असल्याचे सांगीतले. आपल्या सर्व सभासद, कर्मचारी, ऊस तोड/वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करुन कारखान्याची पुढील वाटचाल यशस्वी करु असे प्रतिपादन केले.

प्रस्ताविक कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री हनुमंत उर्फ विलास भुसारे यांनी कारखाना कामकाजाबद्दल माहिती दिली व प्रमुख पाहुणे ॲड. निलेश पाटील यांनी कारखाना शेअर्स घेण्याची लोकांची मानसिकता नसतानाही गोरेंनी जिद्दीने शेअर्स गोळा करून आज हा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे सांगीतले. आपण सन 2003 पासून आजपर्यंत कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत असल्याचे सांगून कारखाना अनेक संकटांना तोड देऊन आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगीतले. आपल्या सहकार्यातून या पुढेही मी कारखान्यासाठी सतत कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली. आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक मा. आयुबखौँ पठाण यांनी करून मा. अध्यक्षांचे परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जहीर केले. बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, ऊस तोड/वाहतुक ठेकेदार, हितचितक, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top