धाराशिव  (प्रतिनिधी)-   तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही. पी. शुगर प्रा. लि. साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला.  संदीपान महाराज हासेगावकर यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कारखान्याच्या आवारात ऊस गाळपासाठी पहिला ऊस आणण्यात आला आणि  संदीपान महाराजांनी यंत्र चालू करून गळीत हंगामाचा शुभारंभ केला. प्रथम गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगला ऊस कारखान्याला द्यावा कारण यावर्षी गुणवत्तेवर कारखाना चालवल्या जाणार आहे व साखरेचे प्रमाण बघून द्यावा असे आवाहनही चेअरमन पाटील यांनी केले आहे. यावेळी उपस्थित शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. कारखान्याने दिलेल्या चांगल्या ऊस दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, आपल्या भाषणात गेल्या वर्षीच्या चाचणी हंगामात कारखान्याने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले. आ. कैलास पाटील यांनी, कारखान्याने 2800 रुपये दर देऊन जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली असल्याबद्दल आभार मानले. उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी,  कारखान्याच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आणि बँकेकडून कारखान्याला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले. 

कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील, संचालक आबासाहेब पाटील, धनंजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कारखान्याच्या  प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य मागितले. या गळीत हंगामात कारखाना चांगल्या प्रकारे चालेल आणि  शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी रंगनाथराव सावंत गुरुजी (ऊस उत्पादक शेतकरी), नितीन गरड (ऊस उत्पादक शेतकरी), सदाशिव पाटील, प्रकाश पाटील, नानासाहेब पाटील (चेअरमन), आप्पासाहेब पाटील, पापा समुद्रे, उध्दव समुद्रे, समर शेख, भारत देशमुख, संग्राम देशमुख, परवेज काझी, जायबाय बापू आदींसह शेतकरी उपस्थित होते.


 
Top