धाराशिव (प्रतिनिधी)- माझ्यासाठी मतदार संघ हेच मंदिर आहे व या मतदार संघातील जनता माझं दैवत म्हणूनच मी काम करतो, यापुढेही त्याचप्रकारे मला सेवा करण्याची संधी मिळेल याची मला खात्री आहे असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव - कळंब मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी मतदारसंघातील गावागावांत भेटी देत जनतेचे प्रश्न ऐकून घेतले. दौऱ्यादरम्यान आ. पाटील यांनी गावांमधील कॉर्नर सभांमध्ये विविध विकास योजनांची माहिती दिली तसेच महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावर तीव्र टीका केली.
कळंब तालुक्यातील देवळाली, हासेगाव, नागुलगाव, एकुरगा, भाटशिरपूरा गावांमध्ये झालेल्या सभांमध्ये बोलताना आ. पाटील यांनी स्थानिक जलसंपदांच्या प्रश्नांवर विचार मांडले. त्यांनी मांजरा आणि तेरणा या नद्यांवरील 38 कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन दिले. या बॅरेजेसद्वारे पाण्याची साठवणूक करून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा त्यांचा मानस आहे. ते म्हणाले, लातूर जिल्ह्याप्रमाणे धाराशिवमध्येही बॅरेजेस उभारून पाणी साठवण्याचा आमचा विचार आहे. या प्रकल्पासाठी आमच्या सत्ताकाळात सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु सरकार बदलल्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली. आता आम्ही या प्रकल्पाला पुनरुज्जीवित करून सिंचनाचा अनुशेष दूर करू.
महागाईच्या प्रश्नावर बोलताना आ. पाटील यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले, महिलांना लाडकी बहिण म्हणून काही आर्थिक मदत केली, मात्र त्याचबरोबर महागाई वाढवून ही मदत दुसऱ्या मार्गाने परत काढून घेतली गेली आहे. तेल आणि किचन बजेटची वाढ झालेली किंमत सर्वसामान्य महिलांना परवडणारी नाही, हे महिलांच्याच तोंडून ऐकायला मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण सुरू आहे आणि सरकारने याबाबत काहीही पाऊल उचललेले नाही. वाढत्या महागाईचा परिणाम सर्वसामान्य घरांवर होत असल्याने या निवडणुकीत मतदारांनी योग्य विचार करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जनसंवाद यात्रा करताना मतदारांशी भावनिक संवाद साधत आ. पाटील म्हणाले की, मतदारसंघ हे माझे मंदिर आहे, आणि जनता हेच माझे दैवत. त्यांच्या सेवेसाठी माझा संपूर्ण वेळ समर्पित आहे, आणि भविष्यातही तो असाच असेल. या निवडणुकीत त्यांना जनतेच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे आणि पुढील काळात मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपला सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या विकासासंबंधित मुद्द्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आमचं सरकार सातत्याने काम करत राहील. सिंचनाच्या सुविधांचा विस्तार करून आणि स्थानिक पाणलोट क्षेत्राचा विकास करून आम्ही शेतकऱ्यांची समृद्धी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. धाराशिव - कळंब मतदारसंघातील जनतेसाठी विकासाची वचनबद्धता आणि सत्ताधारी पक्षावर केलेली तीव्र टीका या दौऱ्यात आ. पाटील यांनी जाहीर सभांमध्ये स्पष्टपणे मांडली आहे.