लोकशाहीत मतदाराच्या मताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण तेच या प्रणालीचा मुख्य आधार आहे. मतदान ही जबाबदारी आहे, नुसता हक्क नाही तर ते कर्तव्य देखील आहे. समाज व राष्ट्र विकासाच्या परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. यासाठीच भारतीय राज्यघटनेत नागरिकांना मतदानाचा हक्क कलम 326 अंतर्गत देण्यात आला आहे. या कलमात नमूद केले आहे की, भारतातील प्रत्येक नागरिक, जो वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला आहे, त्याला सार्वत्रिक मतदानाचा हक्क आहे, जो वंश, जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थितीवर आधारित भेदभाव न करता दिला जातो. भारतीय राज्यघटनेत मतदाराचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय लोकशाहीची रचना “ जनतेसाठी, जनतेद्वारे, आणि जनतेची “ या तत्त्वावर आधारित आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला निवडणुकीत मत देण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे, ज्याद्वारे नागरिक त्यांचे प्रतिनिधी निवडू शकतात. मतदान हा भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ मानला जातो कारण यामुळेच नागरिक त्यांच्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये सहभागी होतात आणि देशाच्या कारभारावर प्रभाव टाकू शकतात. यामुळे नागरिकांच्या मते, आकांक्षा, आणि विचारांचे प्रतिनिधित्व सरकारमध्ये केले जाते. मतदार आपले मत देऊन सरकार निवडतात, जे त्यांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. त्यांचे निर्णय कोणत्या पक्षाला सत्ता मिळेल, कोणते धोरण स्वीकारले जाईल आणि समाजाच्या विकासाचे दिशा ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
मतदारांच्या सहभागामुळेच लोकशाही सशक्त होते आणि त्यात पारदर्शकता येते. जर मतदार जागरूक आणि सजग असतील, तर ते भ्रष्टाचार, पक्षपातीपणा यासारख्या समस्यांना आळा घालू शकतात. म्हणूनच, लोकशाहीत मतदारांचा विचार आणि मतदानाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांच्यामुळेच एक सशक्त, प्रगल्भ आणि सुजाण समाज घडतो. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जनतेची सत्ता कायम ठेवण्यासाठी, लोकशाहीत सत्ता जनतेची असते.“ एक मत, एक आवाजआपल्या हक्काचं मूल्य जाणून घ्या ! “ मतदानाद्वारे आपण योग्य प्रतिनिधी निवडून पाठवतो, जो आपल्या हक्कांचे संरक्षण करतो आणि आपल्या हितासाठी निर्णय घेतो. समाजाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केल्याने योग्य नेते निवडले जातात, जे समाजाच्या विकासासाठी आवश्यक धोरणे आणि कार्यक्रम राबवतात.
स्वतंत्र आणि नीतिमान सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करून आपल्याला भ्रष्टाचार, गैरव्यवहार रोखता येतो, कारण आपण आपले प्रतिनिधी पारदर्शक आणि जबाबदार असावेत यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवतो.
आपले हक्क जपण्याकरिता मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, जो आपल्याला राज्य व्यवस्थेत आपले मत व्यक्त करण्याची संधी देतो. आपण मतदान केल्यासच आपली मागणी मान्य करण्यास नेत्यांवर दबाव येतो. सकारात्मक बदल आणण्यासाठी मतदानाद्वारे आपण आपल्या देशात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, योग्य नेत्यांची निवड करून समाजात सुधारणा घडवून आणू शकतो. म्हणूनच देशाची लोकशाही सुदृढ व टिकवण्यासाठी आणि आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. “ आपले भविष्य तुमच्या हातातमतदान करा, राष्ट्र निर्माण करा ! “निवडणुकीत मतदारांनी आपला हक्क जबाबदारीने आणि माहितीपूर्ण रीतीने बजावला पाहिजे. मतदार म्हणून आपल्याला खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. माहितीपूर्ण निर्णय घ्यावा. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची, त्यांच्या पक्षाची आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांची सखोल माहिती घेतली पाहिजे. त्यांच्या कामगिरीचा अभ्यास करून त्यांचा निवडणूक जाहीरनामा वाचला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज, निर्भीड राहाणे गरजेचे आहे. मतदानाच्या तारखा, मतदान केंद्र आणि आपले नाव मतदार यादीत आहे का ? हे आधी तपासा. आपले ओळखपत्र सोबत ठेवा. लोकशाहीच्या मूल्यांचे पालन करा. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो बजावताना कोणत्याही प्रकारच्या दबाव किंवा लालसेला बळी पडू नका. मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. शक्यतो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान करा. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. आवाजाची ताकद जाणून घेण्यासाठी आपले मत हे आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधी निवडण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामधून आपल्या विचारांचा, समस्या व अपेक्षांचा आवाज प्रतिनिधींना पोचतो. मतदान हा फक्त एक अधिकार नसून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचा, देशाच्या विकासात आपला वाटा उचलण्याचे एक प्रभावी साधन आहे. मतदारांनी मतदान करताना आपल्या मताचा विचारपूर्वक उपयोग करावा, कारण मतदान हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे. मतदारांनी मतदान करण्याची काही महत्त्वाची कारणे आणि निवड करताना विचार करणे महत्वाचे आहे. मतदान हे लोकशाहीचा पाया आहे. मतदान म्हणजे नागरिकांचा हक्क आणि कर्तव्य.“ आपला हक्क, आपली जबाबदारीमतदान करा, भविष्य घडवा ! “ आपल्या मताने देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत बदल घडवू शकतो.
नेतृत्व निवडण्यासाठी मतदानाद्वारे आपण योग्य नेतृत्व निवडतो, ज्यावर पुढील 5 वर्षांसाठी आपल्या भविष्यकाळाच्या गोष्टी अवलंबून असतात. जवाबदारीची जाणीव होण्याकरिता मतदारांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे उपयोग करून भविष्यातील निर्णय घेणाऱ्या नेत्यांना निवडावे, ज्यांना देशाच्या प्रगतीची आस्था आहे. सर्वांसाठी समान हक्क आहे. मतदान हा सर्वांना मिळालेला समान हक्क आहे. जात, धर्म, लिंग, वर्ग इत्यादींवर आधारित भेदभाव टाळून सर्वांना समान अधिकार मिळाला आहे. शासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मतदानाद्वारे शासनाच्या कारभारावर देखरेख ठेवता येते. चुकीचे निर्णय घेणाऱ्या सरकारला बदलण्याची संधी मिळते. भविष्यातील विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडल्यास देशात नवे विकास प्रकल्प येतील, समाजाची प्रगती होईल आणि देशाची एकूणच भरभराट होईल.
“ मतदानातूनच बदल घडवता येतो, तुम्हीही सहभागी व्हा! “ मतदान करताना मतदाराने खालीलप्रमाणे विचार करावा. उमेदवाराची पार्श्वभूमी, शिक्षण, स्वभाव, कार्यक्षमता, जनसंवाद व संपर्क, सामाजिक कार्यातील अनुभव, विचारधारा, पक्षाची भूमिका, कार्य, उमेदवार कोणत्या पक्षाचा, विचारधारा, ध्येय-धोरणे, विकास कार्ये आणि योजना पाहणे. निवडलेल्या उमेदवाराने आपल्या क्षेत्रात कोणती विकासकामे केली आहेत आणि भविष्यातील योजनांची दिशाही तपासली पाहिजे. माहितीपूर्ण मतदान करा. अन्य मतदारांशी चर्चा करून आणि माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित निर्णय घ्या.
मतदान हे देशाच्या भविष्याच्या उभारणीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे,“ चांगल्या राष्ट्रासाठी तुमचे एक मत अमूल्य, नक्कीच मतदान करा ! “ म्हणूनच प्रत्येक नागरिकाने त्याचे महत्त्व ओळखून मतदान करणे अत्यावश्यक आहे. “ सुंदर महाराष्ट्रासाठी चला मतदान केलेच पाहिजे ! “ “ लोकशाहीचा सन्मान करा, मतदान नक्की करा ! “
प्रा. डॉ. महेश मोटे
राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र
श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव.
भ्र. क्र. 9922942362