धाराशिव (प्रतिनिधी)- बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही मोठी गती आली आहे. आजवर 12 हजार 758 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. तर निकषात बसणाऱ्या 6 हजार 328 क्विंटल सोयाबीनचे रू.4892 या हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसाच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केली नाही त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया आपण तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला. त्यामुळे आता हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला मोठी गती आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. ज्या शेतकर्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी 17 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत 12 हजार 758 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. 6 हजार 328 क्विंटल सोयाबीनचे रू. तीन कोटी नऊ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यापूर्वी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रक्रियेला मुदत वाढ मिळावी अशी मागणी आपण केली होती. त्यानंतर त्यात वाढ करून आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.
चार दिवसात सोयाबीनचे पैसे खात्यात जमा
यापूर्वी सोयाबीन विक्रीचे पैसे मिळावे याकरिता चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यात रू. तीन कोटी नऊ जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर 12 टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.