धाराशिव (प्रतिनिधी)- लाडकी बहीण योजनेमुळे मतदान केंद्रावर चांगलाच प्रतिसाद दिसून आला. महिलांनी सर्व मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात चारही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. 6 वाजेपर्यंत 61.87 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार 2019 च्या तुलनेत परंडा मतदारसंघात मतांची टक्केवारी घसरली असून, धाराशिव, तुळजापूर व उमरगा या तीनही मतदारसंघात मतदानांच्या टक्केवारीत वाढ पाहण्यास मिळाली. सकाळी थंडीचा मतदानावर परिणाम झाला. चारही मतदारसंघात 5 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सकाळी 11 नंतर मतदानास वेग आला. तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सर्वच मतदान केंद्रावर गर्दी होती. जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात 1523 मतदान केंद्रावर मतदान झाले. 

जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर व उमरगा मतदारसंघात मताच्या टक्केवारीत 2 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली असून, परंडा मतदानसंघात मात्र 4 टक्क्यांनी मतदान घटले. धाराशिव मतदारसंघात  2019 विधानसभेत 61.20 टक्के मतदान होते. यावेळी त्या 2.55 टक्के वाढून 63.75 टक्के मतदान झाले. तुळजापूर मतदारसंघात 64.87 वरून 66.89 टक्क्यांवर गेले. मतदानामध्ये 2.02 टक्के वाढ झाली. उमरगा मतदारसंघात 58.36 वरून 61.79 वर मतदान गेले. येथे 3.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. परंडा मतदारसंघात गतवेळी 2019 मध्ये 68.31 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र 63.70 टक्के मतदान झाले. यावेळी 4.61 टक्क्यांनी घट झाली आहे. 


 
Top