धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावेळी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, याहीवेळी सत्ता आल्यास शेतकरी कर्जमुक्त करणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.त्यामुळं मोठ्या मतांनी आपले उमेदवार निवडून द्या असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. कळंब विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पळसप येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.
खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत होता. त्यावेळी सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 11 हजार रुपये होता, मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे तो दर आता फक्त चार ते साडेचार हजार रुपयांवर घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. याच मुद्द्यावरून ते म्हणाले की, एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य देण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे. हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका देणारे आहे.
तसेच त्यांनी धाराशिव - कळंब मतदारसंघातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. “आज नोकऱ्यांच्या अभावामुळे धाराशिव - कळंबचा तरुण वर्ग पुणे आणि मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. पण हे स्थलांतर केवळ रोजगाराच्या संधींअभावी होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या संधी आणण्याची महायुती सरकारची असमर्थता यामुळे दिसून येते. पुण्यात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला. हे फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे,“ असे निंबाळकर म्हणाले.
याशिवाय, निंबाळकर यांनी तेर येथे संत गोरोबा काका मंदिराच्या विकासासाठी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. संत गोरोबा काका मंदिराचा विकास करण्यासाठी राणा पाटील यांनी स्वतःची जमीन देण्याऐवजी एका गरीब व्यक्तीची जमीन अधिग्रहित केली. हे केवळ गरिबांच्या हक्कांवर अन्याय करणारे आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे पाऊल आहे. राणा पाटील हे गरिबांच्या घरावर नगर फिरवतात, असे निंबाळकर यांनी आरोप केले.
या सभेत शेतकरी, बेरोजगार युवक, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. महाविकास आघाडीने या सभेतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगाराच्या संधीसाठी आवाज उठवला. धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघात या सभेचा प्रभाव पडण्याची शक्यता असून, निवडणूक प्रचाराला एक नवी दिशा मिळाली आहे.