धाराशिव (प्रतिनिधी)- या भागाचा व्यापक आणि सर्वांगीण विकास हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून करीत असलेल्या प्रामाणिक कामाला मतदार बंधू-भगिनींनी मोठे समर्थन दिले आहे.पुढील काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कटिबध्द आहे. अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे न्यावयाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोठे पाठबळ दिले. त्यामुळेच मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यासाठी महत्वपर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि योजना पूर्णत्वाकडे आल्या आहेत.महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयामुळे राज्यातील जनतेने हा कौल दिला आहे. आपण केलेल्या प्रामाणिक कामावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारांचे धन्यवाद मानले आहेत.
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या मान्यवर नेते मंडळींनी सहकार्य केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचे पाणी डिसेंबर अखेरीस जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि महत्वाच्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांत एका निर्णायक टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यात यश आले आहे. कौडगाव, तामलवाडी एमआयडीसीतील रोजगार निर्मितीला गती आली आहे.