नळदुर्ग (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि. 14 नोव्हेंबर रोजी ना. नितीन गडकरी यांची नळदुर्ग येथे जाहीर सभा आहे. यानिमित्त गेल्या दहा वर्षांपासुन रखडत पडलेल्या व धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापुर -हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाकडे त्यांचे लक्ष देण्याची मागणी नळदुर्ग, अणदूर, जळकोट या भागातून होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापुर - हैद्राबाद या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासुन रखडत पडले आहे. वास्तविक पाहता या कामात कुणाचीही अडकाठी नाही. असे असताना केवळ राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार यांच्या गलथान तसेच निष्क्रिय कारभारामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासुन रखडत पडले आहे. आजही हे काम पुर्ण झाले नाही त्यामुळे याचा फटका नागरीक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. हे काम पुर्ण व्हावे यासाठी अनेक गावांतील नागरीकांनी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केले आहेत. तरीही निगरगठ्ठ झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांनी हे काम पुर्ण केले नाही. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चौकशी करुन यामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करुन हे काम लवकर पुर्ण करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले नाही म्हणुन गेल्या दहा वर्षात खानापुर ते तलमोड पर्यंत झालेल्या 390 अपघातामध्ये 420 पेक्षा जास्त नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या अपघामध्ये जे जखमी झाले आहेत त्यातील अनेक जणांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आले आहे. अशी गंभीर परीस्थिती असतांना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापुर-हैद्राबाद हा महामार्ग सध्या वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे.
सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची मंजुरी 2012 मध्ये मिळाली आहे. मात्र 2014 साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. आज 2024 हे वर्ष संपत आले आहे. तरी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले नाही. सोलापुर ते तलमोड पर्यंतच्या 100 किलोमीटर कामासाठी 780 कोटी रुपयाचे बजेट मंजुर झाले होते. दि. 3 जुन 2014 रोजी या कामास सुरुवात करण्यात आली होती. अडीच वर्षात हे काम पुर्ण करणे गरजेचे होते मात्र आज दहा वर्षे झाले तरी हे काम रखडतच पडले आहे. या 100 किलोमीटरच्या महामार्गावरील अनेक कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार आहेत. सध्या जे काम सुरु आहे तेही अतिशय संथगतीने सुरु आहे.
हे काम पुर्ण झाले नसल्याने आज दररोज अणदुर, नळदुर्ग आणि जळकोट याठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन अनेक तास वाहने अडकुण पडत आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासुन रखडत पडलेल्या सोलापुर -हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करुन घेण्याचे आदेश ना. नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला कडक शब्दात देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम कुठलाही अडथळा नसताना दहा वर्षे रखडत पडण्याची देशातील ही पहिलीच घटना असेल.
नळदुर्ग शहराच्या बाहेरून बायपास मार्गे हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गालगत अतिशय प्राचिन असे श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे. हे ठिकाण श्रीक्षेत्र मैलारपुर या नावाने ओळखले जाते. जानेवारी महिन्यात याठिकाणी मोठी खंडोबाची यात्रा भरते. यावेळी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगना या राज्यातील जवळपास 5 ते 6 लाख भाविक याठिकाणी उपस्थित असतात. खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडुन जावे लागते. मात्र या चौपदरीकरणाच्या कामात भाविक महामार्ग ओलांडुन खंडोबा मंदिराकडे कसे जाणार याची दक्षात राष्ट्रीय मगामार्ग विभागाने घेतली नाही. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ना. नितीन गडकरी यांनी याबाबतही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याठिकाणी भाविक व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी कांही उपाययोजना करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.