धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद-कळंब विधानसभेच्या निवडणूक रिंगणात एकूण 12 उमेदवारांपैकी विजय उमेदवार महाविकास आघाडीचे कैलास पाटील व पराभूत उमेदवार महायुतीचे अजित पिंगळे वगळता उर्वरित 10 उमेदवारांना अनामत रक्कम देखील वाचवता आली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे उस्मानाबाद-कळंब विधानसभेसाठी झालेल्या एकूण मतदानात नोटा ला 1 हजार 581 मते मिळाली आहेत.
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 75 हजार 359 मतदार आहेत. त्यापैकी ईव्हीएम वरील आणि टपाली मिळून एकूण 2 लाख 43 हजार 170 एवढे मतदान प्रत्यक्षात झाले. त्यातील नोटाची 1 हजार 581 मते आणि बाद झालेली 175 मते असे 1 हजार 756 मते वगळता एकूण वैध मते 2 लाख 41 हजार 414 आहेत. अनामत रक्कम वाचविण्यासाठी उमेदवाराला निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश म्हणजेच 16.66 टक्के मते मिळायला हवी. तरच संबंधित उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळते. एकूण वैध मतांची गणना करताना नोटाला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत. निवडणूक रिंगणात कमीत कमी उमेदवार उतरावेत. म्हणूनच निवडणूक आयोगाने अनामत रकमेची अट घातली आहे. त्यानुसार उस्मानाबाद-कळंब विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराला अनामत रक्कम वाचवण्यासाठी किमान 40 हजार 434 मते मिळविणे गरजेचे होते. परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी उमेदवार कैलास पाटील आणि दुसऱ्या स्थानी राहिलेले शिवसेना पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे या दोघांमधेच खरा सामना झाला.
विजय उमेदवार कैलास पाटील यांना 1 लाख 30 हजार 573 मते मिळाली. तर अजित पिंगळे यांना 94 हजार 7 मते मिळाली. निवडणूक रिंगणातील इतर 10 उमेदवारांना अनामत रक्कम वाचवण्यासाठी देखील मते मिळाली नाहीत. त्यापैकी 8 उमेदवारांना तर नोटाला मिळालेल्या मतापेक्षा कमी मते पडलेली आहेत. त्यामुळे या 10 उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली आहे. उस्मानाबाद-कळंब मतदार संघातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे कैलास पत्तटील, शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यासह मनसेचे देवदत्त मोरे, वंचित, अपक्ष असे एकूण 12 उमेदवार रिंगणात होते.