धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार विराजमान व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर येथे (दि. 28) कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीची महापूजा करून साकडे घातले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजिदादा पवार व्हावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत देखील अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हणून अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत याकरीता कार्यकर्त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत कुलस्वामीनी आई तुळजाभवानी देवीची खणा-नारळाने ओटी भरून महापूजा केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवार समर्थक तथा अजितदादा विचार प्रसारक मंडळ धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार गवारे म्हणाले की, महाराष्ट्राचे धाडसी, कर्तव्यदक्ष आणि अनुभवी नेतृत्व अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आज देविचरणी साकडे घातले आहे. महाराष्ट्र राज्याला देशात नंबर वन आणि सर्वात पुढे न्यायचे असेल तर सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची जाण असणारे अजित पवार मुख्यमंत्री होणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी नंदकुमार गवारे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार, सदस्य दत्तात्रय हुंडेकरी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.