धाराशिव (प्रतिनिधी)- भारत देश विस्ताराने मोठा असून केवळ संविधानामुळे एक संघ राहिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी संविधान देऊन पुढे जगातील सर्वात मोठी लोकशाही देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी केले.
संविधान दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ते जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा तडवळे येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आकलन, आकलनयुक्त अभ्यास व सराव त्रिसूत्रीचा वापर करावा असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच स्वातीताई जमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, उपाध्यक्ष शुभांगी करंजकर, काळे ताई, सदस्य सौदागर होगले, ठाणे अंमलदार गुंजकर, जय हिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गाढवे, केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक पवार, जमाले, सेवानिवृत्त शिक्षक लांडगे, गावचे ज्येष्ठ नागरिक अच्युत भालेराव, केंद्रप्रमुख जगदीश जाकते उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील 75 विद्यार्थिनींना त्यांनी खरेदी केलेल्या संविधानाचे वाटप करण्यात आले. शाळेतील सहशिक्षक देशटवाड संजय यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ धायगुडे यांनी केले.