तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अखेरच्या फेरीत 36879 मतांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला.  त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. धीरज पाटील यांचा पराभव केला. तुळजापूर मतदारसंघात आमदार पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांना मंत्री पदाची संधी मिळेल, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

2024 महाविकास आघाडी व महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात धाराशिव जिल्ह्यात भाजप व काँग्रेसला प्रत्येकी एकच तुळजापूर मतदारसंघाची जागा मिळाली होती. तुळजापूर मतदारसंघात भाजप महायुतीकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील सलग दुसऱ्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले होते. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांना मैदानात उतरविण्यात आले होते. महायुतीचे आमदार पाटील, आघाडीचे ॲड. पाटील यांच्यासह समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी, वंचित आघाडीच्या डॉ. स्नेहलता सोनकाटे यांच्यासह एकूण 23 उमेदवार या निवडणुकीच्या माध्यमातून नशिब आजमावत होते. कधी काळी तुळजापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या

आमदार पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवून विजय मिळविला होता. यंदा माञ काँग्रेस व भाजपासाठी तुळजापूर मतदारसंघात अस्तित्वाची लढाई रंगली होती. तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती, समाजवादी पार्टी, वंचित आघाडीसह सर्वच राजकीय पक्ष व अपक्षांनी विविध मुद्यावरून प्रचाराचा धुराळा उडवून निवडणुकीत रंगत आणली होती. 

बुधवारी (दि.20) मतदान घेण्यात आले. तुळजापूर मतदारसंघात एकूण 3 लाख  83 हजार 672 मतदारांपैकी 2 लाख 59 हजार 489 मतदारांनी मतदानाचा

हक्क बजावला. सरासरी 66.98 टक्के मतदान झाले. मतदान झाल्यापासून मतदारसंघात कोण विजयी होणार? या प्रश्नाची उत्सुकता शिगेला पोहंचली होती. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्पोर्टस हॉल येथे शनिवारी (दि.23) स. 8 वा. निवडणूक निर्णय अधिकारी संजय डव्हले

यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. या निवडणुकीत आमदार पाटील यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंतच्या प्रत्येक फेरीत मताधिक्य

कायम राखले. शेवटच्या फेरीअखेर महायुतीचे आमदार पाटील यांना 1 लाख 31 हजार 863 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे ॲड.

पाटील यांना 94 हजार 984, समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी 16 हजार 336 मतदान मिळाले. यात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील  36 हजार 789 मताने विजयी झाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या जागेवर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. आमदार पाटील हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याने त्यांना मंञी पदाची संधी मिळेल अशी चर्चा आहे.

अँड कुलदिप धीरज आप्पासाहेब कदम पाटील (काँग्रेस) 93842, राणाजगजितसिंह पद्यमसिंह पाटील 1,30,352 (भाजप), आण्णासाहेव रघुनाथ दराडे 420 (प्रहर जनशक्ती पार्टी), ताबोळी शब्बीर सल्लाउद्दीन (ऑल इंडिया मजलिस ए इन्कीलावई मिल्लत)247, धनंजय मुरलीधर तरकसे  पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष) 239, धिरज पंडीत पाटील (आदर्श संग्राम पार्टी) 178, भैय्यासाहेव प्रल्हाद नागटिळे  (आझाद समाज पार्टी

 काशीराम) 786,रोचकरी देवानंद साहेबराव तुळजापूर (समाजवादी पार्टी) 16271, शरद हरीदास पवार (संभाजी ब्रिगेड पार्टी) 233, सचिन सुरेश शेडगे

(जनहित लोकशाही पार्टी) 168, डॉ. स्नेहा आप्पाराव सोनकाटे (वंचित बहुजन आघाडी) 7792, अमीर इब्राहीम शेख (अपक्ष) 252, अमेर सरदार शेख (अपक्ष) 163, उज्वला विनोद गाटे (अपक्ष) 314, काकासाहेव बाबूराव राठोड (अपक्ष) 417, केदार योगेश शंकर  (अपक्ष) 544, तात्या पंढरीनाथ रोडे

 (अपक्ष) 599, दत्तात्रय देविदास कदम (अपक्ष)741, धनाजी गौतम हुवे  (अपक्ष) 153, अँड पूजा विभीषण देडे (अपक्ष) 374, मन्सुर अहेमद मकसुद शेख (अपक्ष)114, रोचकरी गणेश देवानंद  (अपक्ष)152, सत्यवान नागनाथ सुरवसे (अपक्ष) 464, नोटा  745.


 
Top