धाराशिव (प्रतिनिधी)- वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सकारात्मकता हेच अत्यंत प्रभावी औषध आहे. रुग्णावर उपचार करताना रुग्णाची सकारात्मकता वाढविण्यावर डॉक्टरांनी भर दिल्यास कोणत्याही आजाराचे रुग्ण बरे होण्यास मदत होईल. त्यामुळे रुग्णाची सकारात्मकता वाढून औषधोपचाराबरोबर त्यांची मानसिकता देखील प्रभावी होईल, असे मत प्रेरक वक्ते डॉ.अर्शद सय्यद यांनी व्यक्त केले.
धाराशिव शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथमवर्ष आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे, डॉ.तबस्सुम शेख़, डॉ.किरण मगर, डॉ. शेवाले, डॉ.स्नेहल जाधव, डॉ.स्वामी, डॉ. पारड़े, डॉ. गुरमे, डॉ. मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अर्शद सय्यद म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात सेवा करत असताना सकारात्मक पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव देखील रुग्णाला आजारातून बरे करण्यासाठी कामी येतो. म्हणून आपण व्यक्तीमत्त्व विकासावर देखील भर दिला पाहिजे. त्याकरिता आपण वैद्यकीय सेवा देताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथमवर्ष आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेसाठी अब्दुल्ला ख़ान, ़फैज़ान शैख़ यांनी परिश्रम घेतले.