उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा  लोहारा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या शेतात कृष्णा खोऱ्याचे पाणी खळाळणार आहे. त्यासाठी 572 कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने मंजूर केला आहे. उमरगा तालुक्यातील 2057 हेक्टर आणि लोहारा तालुक्यातील 2147 हेक्टर अशी एकूण 4204 हेक्टर म्हणजेच 10 हजार एकरांपेक्षा अधिक शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या भगीरथ प्रयत्नांतून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे.

कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्याच्या हक्काचे 7 टीएमसी पाणी आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे पाणी पहिल्यांदा तुळजापूर येथे येणार आहे. त्यानंतर ते उमरगा, लोहारा तालुक्यांत येणार आहे. सातपैकी 2.24 टीएमसी पाणी पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरअखेरीस तुळजापूर येथील रामदरा तलावात येणार आहे. 

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही याला दुजोरा दिला आहे. लोहारा येथे आयोजित प्रचारसभेत डॉ. शिंदे यांनी या योजनेसाठी 572 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन महिन्यांत तुळजापुरात हे पाणी येईल. त्यानंतर दोन वर्षांत ते पाणी उमरगा आणि लोहारा तालुक्यांत येणार आहे, असे त्यांनी सांगितले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प क्रमांक 2 चे काम काही अडचणींमुळे रखडले होते. ते आता पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या 21 टीएमसीपैकी 7 टीमएसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे पाणी तुळजापूरलगतच्या रामदरा तलावात येणार आहे. तेथून ते पाणी पुढे लोहारा आणि उमरगा तालुक्यात येणार आहेतेथून ते पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार असताना या योजनेचे काम रखडले होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, उमरगा-लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघात कृष्णा खोऱ्याचे पाणी खळाळणार आहे. 


या तलावांत आणणार पाणी

सुरुवातीला उमरगा तालुक्यातील 15 आणि लोहारा तालुक्यातील 6 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. जोड़कालव्यांतून पाणी आणून ते साठवण तलावांत सोडण्यात येणार आहे. लोहारा तालुक्यातील बेलवाडी साठवण तलाव, माळेगाव पाझर तलाव, जेवळी -1 साठवण तलाव, जेवळी-2 साठवण तलाव,न उमरगा तालुक्यातील बेन्नितुरा मध्यम प्रकल्प, सुपतगाव साठवण तलाव आणि जकापूर मध्यम प्रकल्पात हे पाणी येणार आहे. तुळजापूर तालुक्यात कुरनूर मध्यम प्रकल्प, नळदुर्ग बॅरेज 1 आणि 2 मध्ये हे पाणी येणार आहे.


 
Top