धाराशिव (प्रतिनिधी)-गतवर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने हिवाळ्यापासून प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली होती. यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 226 पैकी 108 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. एकूण प्रकल्पात 560.866 दलघमी म्हणजेच 77 टक्के पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

गतवर्षी मान्सुनमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडेच राहिले होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून उपलब्ध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. तरीही अनेक गावांना जानेवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. मे महिन्यापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक गावांमध्ये अधिग्रहणे व टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. या वर्षी मात्र जून महिन्यापासूनच दमदार पाऊस झाला.

सप्टेंबर महिन्यातच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस पडत राहिला. नोव्हेंबर महिन्यातही 226 पैकी 108 प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. 29 प्रकल्पात 75 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. 31 प्रकल्प असे आहेत की, त्या प्रकल्पांमध्ये 51 ते  75 टक्केपर्यंत पाणी आहे. 27 प्रकल्पात 26 ते 50 टक्के जलसाठा आहे. 22 प्रकल्पात 25 पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर 9 प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. एकूण प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत 560.866 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.


 
Top