धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 04 विधानसभा मतदारसंघ असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक 15.10.2024 पासुन आचारसंहिता लागु झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीसांनी अवैध धंद्याविरुध्द विशेष मोहिम राबवून गोपनिय माहिती वरुन ठिक-ठिकाणी छापा कारवाई करुन मोठ्या प्रमाणात अवैध दारु, गुटखा, अंमली पदार्थ, रोख रक्कम मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध अग्निशस्त्र, काडतुस, तलवार, चाकु बाळगणाऱ्या इसमांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आले आहे.
जिल्ह्याभरात हॉटेल, ढाबे, दारुविक्री करणाऱ्याचे राहत्या घराची झडती घेवून, अवैध दारुची चोरटी वाहतुक करणारे, नदीकाठी देशी दारु आड्डे, गावठी हातभट्टी, ताडी तयार करणारे आड्डे उध्वस्त करुन विक्री करणाऱ्या इसमांवर एकुण 321 गुन्हे दाखल केले असुन 81 हजार 235 लिटर अवैध दारु जप्त करुन अंदाजे 67 लाख 09 हजार 260 रूपये किंमतीचा अवैध दारु संबंधी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
जिल्ह्यात शाळा,कॉलेज, बाजारपेठ, किराणा दुकान, पानटपऱ्या व इतर संशयीत दुकानांची अचानकपणे झडती घेवून प्रतिबंधीत गुटखा विक्री करणारे, गुटखाची ट्रक व इतर वाहनाद्वारे विक्रीसाठी चोरटी वाहतुक करणारे इसमांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येवून 12 गुन्हे दाखल केले असुन 3 हजार 784 किलो गुटखा जप्त करुन 76 लाख 74 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
तसेच जिल्ह्यात परराज्यातुन विक्रीसाठी गांजाची तस्करी वाहतुक करणारे व इतर अवैध अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या इसमांवर 04 गुन्हे दाखल केले असुन 52.450 किलो अंमली पदार्थ जप्त करुन अंदाजे 12 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल धाराशिव जिल्ह्यामध्ये धडक कारवाई करुन जप्त करण्यात आलेला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुक 2024 शांततेत व भयमुक्त होण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, माहितगार गुन्हेगार, संशयीत गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर्स, पाहिजे, फरारी आरोपी, आरोपीयांचा शोध घेणेकामी व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणेकामी वेळोवेळी कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान व इतर मिळालेल्या गोपनिय माहितीद्वारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व संशयीत यांचा शोध घेवून 05 अवैध अग्निशस्त्र ( गावठी कट्टा/पिस्टल) व 20 नग अवैध तलवार, चाकु जप्त करुन जिल्ह्यात शस्त्र अधिनियम प्रमाणे 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच परराज्यातुन अवैध तलवार/चाकु हे कुरियरच्या माध्यमातुन तस्करी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.तसेच धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच दिवसांपासुन मिळून न येणारे 68 पाहिजे, 09 फरारी आरोपी यांचा शोध घेवून पकडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये 798 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुक 2024 आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने नाकाबंदी वाहन चेकींग दरम्यान 11 लाख 48 हजार रोख रक्कम जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे. अचारसंहिता कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये वाहतुक शाखेकडून विशेष चेकींग मोहिम राबवून मोटार वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या इसमांवर 3 हजार 226 केसेस करुन 27 लाख 33 हजार 550 दंड करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्याची हद्द कर्नाटक राज्य लगत 64 कि.मी. सीमा आहे. सदर सिमेवर एकुण 4 ठिकाणी आंतर राज्य चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. सदर चेकपोस्टवर आचारसंहिता लागु झाल्यापासुन आजपर्यंत 4 हजार 500 लिटर अवैध दारु व 2 हजार किलो प्रतिबंधीत गुटखा तसेच 9 लाख रूपये किंमतीचा 36 किलो अवैध गांजा जप्त करण्यात आलेला आहे.
विधानसभा आचारसंहिता कालावधीमध्ये आजपर्यंत रेकॉर्डवरील 06 गंभीर गुन्हेगारांवर कठोर कायदा अंतर्गत कार्यवाही करुन 1 गुन्हेगारास जेलमध्ये स्थानबंध करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56/57 अन्वये 34 आरोपींना जिल्ह्यातुन तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत.तसेच भारतीय न्याय सुरक्षा सहिंता कलम 126 अन्वये 1,662, कलम 128 अन्वये 63 व कलम 129 अन्वये 174 प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असुन मुंबई पोलीस अधिनियम कलम 93 नुसार 204 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात एकुण 2,144 इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुक बंदोबस्तकामी जिल्ह्याकरीता केरळ, राजस्थान येथुन निमलष्करी दलाचे मदतीने जिल्ह्यात 300 ठिकाणी रुट मार्च करण्यात आलेले आहे.
विधानसभा निवडणुक 2024 शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्याकरीता, कोणतीही अप्रिय घटना घडु नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता जिल्ह्यामध्ये बंदोबस्तकामी 05 पोलीस उप अधीक्षक, 20 पोलीस निरीक्षक, 104 सपोनि/पोउपनि असे एकुण 129 पोलीस अधिकारी, तसेच 1,604 पोलीस अमंलदार व 1,450 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन धाराशिव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल फोन/ईलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नये. प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. मतदारांनी निर्भय पणे मतदान करावे.असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनतेस केले आहे.