उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा लोहारा विधानसभा निवडणूकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 4) 28 पैकी तब्बल 18 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महायुतीच्या घटकपक्ष असलेल्या भाजपचे कैलास शिंदे व त्यांचे पुत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्विजय शिंदे यांनी बंडखोरी करीत अपक्ष फॉर्म भरला होता. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर कॉग्रेसचा एका व शिवसेने (ठाकरे) च्या चार बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडली. महाविकास आघाडीच्या प्रविण स्वामी यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून दलित नेत्यांनी बैठक घेत एकच उमेदवार देण्याचे व बाकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेणाचे ठरले. त्यानुसार अशोक सरवदे हे एकमेव उमेदवार देण्याचे ठरले. तसे माध्यमासमोर जाहीर केले. पण नंतर झालेल्या घडमोडीत अशोक सरवदे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोमवारी सकाळपासूनच विविध पदाधिकारी व नेते इच्छुकांची समजून काढून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्नशील होते. तर उमेदवारांची संख्या कमी होऊन मतदानासाठी एकच मशीन लागावी यासाठी प्रशासन पाण्यात देव घालून बसले होते. एकुण 28 जणांपैकी सोमवारी तीन वाजेपर्यंत 18 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले यामध्ये कैलास शिंदे, दिग्विजय शिंदे, अशोक सरवदे, उमेश ज्ञानदेव सुरवसे (जनहित लोकशाही पार्टी), दिलीप नागनाथ गायकवाड (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रभाकर माणिक कवाळे (राष्ट्रीय समाज पक्ष), गुरुबसय्या निळकंठय्या स्वामी, विरपक्ष निळकंठय्या स्वामी, प्रशांत बब्रुवान काळे, श्रीमंत किसनराव सुरवसे, विलास शरणाप्पा व्हटकर, सचिन हरिचंद्र माने, विजय महादेव वाघमारे, प्रा. अँड. पांडूरंग शंकरराव पोळे, प्रा. डॉ. संजय रामचंद्र कांबळे, वामन श्रीरंग पांडगळे, दत्तु विठोबा हिराळे, बालाजी एकना कोनाळे या 18 जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. आता निवडणूक रिंगणात ज्ञानराज धोंडीराम चौगुले (शिवसेना - महायुती), प्रविण विरभद्रय्या स्वामी (शिवसेना उबाठा - महाविकास आघाडी), राम सैदा गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), शिवप्रसाद लक्ष्मणराव काजळे (मराठ मूक्ती मोर्चा), सातलिंग सामलिंग स्वामी (प्रहार जनशक्ती पक्ष), संदिप धर्मा कटबु (रिपब्लीकन पार्टी ऑात्र इंडिया आ.), सुनंदा शंकर रसाळ (बहुजन समाज पार्टी), अजयकुमार विष्णू देडे, उमाजी पांडुरंग गायकवाड, श्रीरंग केरनाथ सरवदे (सर्व अपक्ष) हे दहा इच्छुक निवडणुक रिंगणात आहेत.
उमरगा विधानसभेवर मागील वीस वर्षांपासून शिवसेनेचे एकछत्री अंमल आहे. पहिले पाच वर्षे प्रा. रविंद्र गायकवाड यांनी पाच वर्षे आमदार म्हणून काम पाहिले. तर मागील 15 वर्षांपासून ज्ञानराज चौगुले यांनी या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये सामील होत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत मार्गे गुवाहाटी गाठली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आ चौगुले यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. पहिल्याच यादीत नांव आल्यानंतर आमदार चौगुले यांनी प्रचारात आघाडी घेतली तर दुसरीकडे महाविकास आघाडीची जागा कोणाला सुटणार व उमेदवार कोण याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर शेवटच्या दिवशी कोरेगाव जिल्हा परिषदेचे माजी मुख्याध्यापक प्रविण स्वामी यांना शिवसेनेचा (ठाकरे) एबी फॉर्म देण्यात आला. महाविकास आघाडीच्या पाच इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेत आपली उमेदवारी दाखल केली.
यांची बंडखोरी मागे - शिवसेना (ठाकरे) पक्षाचे इच्छुक अशोक सरवदे, विलास व्हटकर, विरपक्ष स्वामी व प्रा. डॉ. संजय कांबळे तसेच काँग्रेसचे विजय वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरीचे हत्यार उपसले होते. परंतु अखेर या सर्वांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर विश्वास ठेवून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे व लोहारा येथील कॉग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले.