धाराशिव (प्रतिनिधी)-  सुरुवातीच्या टप्प्यात बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला वेग येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर खरेदीसाठी पुन्हा एकदा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाफेडकडे आता 15 डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी. आजवर जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवर निकषात बसणाऱ्या तब्बल 25 हजार क्विंटल सोयाबीनची 4892 रूपये या हमीभावने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी मोठ्या वेगात सुरू आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याच्या तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला होता त्यामुळे हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला गती आली आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील 15 दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. सध्या जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच खरेदीलाही मोठी गती मिळत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

 
Top