धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी रेल्वे विभागाने मान्य केली असून, लातूर- मुंबई रेल्वेला कायम स्वरूपी तीन कोच 1 डिसेंबरपासून वाढविण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांत समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणे-मुंबईसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक ये-जा करीत असतात. धाराशिव जिल्ह्यातील अनेक जणांचे कायमस्वरूपी वास्तव्य पुणे-मुंबई येथे आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या आहे. बऱ्याचदा आरक्षणाअभावी रेल्वे प्रवाशी वैतागलेले दिसून येतात. त्यामुळे उस्मानाबाद-मुंबई किंवा लातूर-मुंबई सकाळी एखादी रेल्वे सुरू करावी अशा स्वरूपाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्याऐवजी रेल्वे विभागाने हरंगुळ (लातूर)- पुणे ही गाडी नियमित सुरू केली आहे. तरी सुध्दा सण, उत्सवाच्या काळात वेटींग प्रवाशांची संख्या कमी झालेली पहायला मिळत नाही. विशेष म्हणजे रात्रीची लातूर-मुंबई व बीदर- मुंबई या रेल्वे गाड्या प्रवासासाठी सोयीस्कर असल्याने या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबईहून लातूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीस 1 डिसेंबर 2024 पासून तर लातूर येथून 2 डिसेंबर 2024 पासून दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर कोचची वाढ करण्यात आली आहे. तर बीदर-मुंबई व मुंबई-बिदर या दोन्ही रेल्वे गाडीस 4 व 5 डिसेंबर 2024 पासून दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर कोचची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वे गाडीस नवीन कोच संरचना प्रमाणे प्रथम श्रेणी वातानुकूलित एक, वातानुकूलित टू टियर दोन, वातानुकूलित थ्री टियर चार, स्लीपर आठ, जनरल चार, एसएलआर दोन या प्रमाणे ही रेल्वे गाडी 21 कोचची होणार आहे. त्यामुळे लातूर-उस्मानाबाद-बार्शी या भागातील रेल्वे प्रवाशांची सोय या वाढीव कोच मुळे होणार आहे.
कोल्हापूर- नागपूर नियमित सुरू करण्याची मागणी
गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर- नागपूर व हैद्राबाद- पुणे या दोन्ही रेल्वे गाड्या नियमित सुरू करण्याची मागणी रेल्व लोक आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपाणीकर यांनी केली आहे. या मागणी संदर्भात तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली होती. या दोन्ही रेल्वे गाडीस प्रवशांचा उत्तम प्रतिसाद असून, हैद्राबाद गाडी रविवारी, मंगळवार, शुक्रवार या तीन दिवशी आहे. कोल्हापूर गाडी सोमवारी आणि शुक्रवारी आहे. तर नव्याने सुरू करण्यात आलेली कोल्हापूर- धनबाग ही शुक्रवारी आहे. त्यामुळे कोल्हापूर- नागपूर व हैद्राबाद- पुणे या दोन्ही गाड्या नियमित सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.