धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा मोठ्या वेगाने कायापालट सुरू आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांसह रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. तुळजापूरसह तालुक्यातील क्रीडाप्रेमी नागरिक आणि क्रीडापटूंची स्वतंत्र तालुका क्रीडा संकुलची अनेक वर्षांपासून मागणी होती.आपल्या पाठपुराव्यामुळे क्रिडासंकुलसाठी 3.85 कोटी रुपये उपलब्ध झाले असून  सुसज्ज आणि सर्व सोयीसुविधायुक्त तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरील तालुका क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियमच्या इमारतीसह अन्य कामांचे 12 ऑक्टोबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत क्रीडाप्रेमी नागरिक आणि क्रीडापटूंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. धाराशिवसह तुळजापूर तालुक्यात क्रीडा संस्कृतीची मोठी परंपरा राहिलेली आहे तुळजापूर येथील जुन्या काळातील कबड्डीपटूंनी तीर्थक्षेत्र तुळजाभवानी देवीच्या शहराचा नावलौकिक आपल्या क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रस्तरावर कोरलेला आहे. आजही रणसम्राट कबड्डी संघाचा मोठ्या आदराने राज्यभरात उल्लेख केला जातो. मागील पिढीने मोठ्या संघर्षातून सोयीसुविधा नसताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला लौकिक पोहोचविलेला आहे. हा अभिमानास्पद क्रीडा वारसा आपण सर्वांनी सक्षमपणे पुढे नेणे अत्यावश्यक असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

तुळजापूर शहरासह तालुक्यातील क्रीडाप्रेमी नागरिक आणि क्रीडापटूंची अनेक वर्षाची मागणी महायुती सरकारमुळे पूर्ण झाली आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकुलासाठी तीन कोटी 85 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. खो-खो, कबड्डीच्या मैदानांसह एक सुसज्ज इनडोअर स्टेडियम याठिकाणी उभारले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. सर्व सुविधांनी युक्त इनडोअर स्टेडियमबरोबरच  200 मीटर लांबीचा तंत्रशुद्ध ट्रॅक, वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र वाहनतळ आणि शेड, क्रीडा संकुलासाठी अंतर्गत रस्ता नाल्या आणि खोखो आणि कबड्डीसाठी दोन स्वतंत्र मैदान यातून तयार केली जाणार आहेत. याकरिता आवश्यक असलेला निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच या इनडोअर स्टेडियमसाठी दहा लाख रुपयांच्या फर्निचरचाही यात समावेश असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच या कामाची निविदा जाहीर करण्यात आली होती. जेसीबीच्या माध्यमातून येथील साफसफाई आणि जमीन लेवल करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून एका सर्व सुविधांनी युक्त अशा स्वतंत्र क्रीडा संकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रीडापटूंचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.


 
Top