धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील एका महिलेला अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्तीपत्र देण्यासाठी 10 हजार रूपयाची लाच घेत असताना एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यिका व चिंचोली (ता. तुळजापूर) येथील अंगणवाडी सेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे एका महिलेची अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाली होती. मात्र तिला नियुक्तीपत्र देण्यासाठी तुळजापूरच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या विभागातून अडवणूक सुरू होती. यामुळे महिलेच्या पतीने वारंवार विनंती केली. मात्र कनिष्ठ सहाय्यिका मई बळीराम खांडेकर व चिंचोलीची अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम हिने 15 हजार रूपयांची लाच मागितली. तेव्हा पतीने थेट एसीबी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. पोलिस उपाधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने सापळा लावला. तेव्हा 15 हजार पैकी 10 हजार रूपये स्विकारताना दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.