धाराशिव (प्रतिनिधी)- भूम परांडा वाशी या तीन तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत आणि आधार असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे परवा दुःखद निधन झाले. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि आमचे नाते मेव्हण्यांचे मात्र नात्यापेक्षा त्यांनी मला मित्र म्हणून वागवले. भैय्या तू परंडा येथे काहीतरी शैक्षणिक संस्था सुरू केली पाहिजे माझ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची ही सोय होईल असं म्हणून मला इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यास त्यावेळेस त्यांनी खूप आग्रह केल्यामुळे मी या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल उभा केले आज या संकुलाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी बाहेर पडून मोठ्या पदावर ती कार्यरत आहेत.


 मी अनेक आमदार खासदार पाहिले मात्र तात्यांच्या रूपात मला एक साधा राहणीमान व ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असणारा आमदार मी तात्यांच्या रूपात पाहिला.भूम परंडा या विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा नेतृत्व केलं.वाशी तालुक्याचे त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही मात्र तरी देखील तीनही तालुक्यातील सामान्य शिवसैनिकांशी नेहमीच संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर राहणारा नेता म्हणूनच त्यांच्याकडे शिवसैनिक कायम पाहत आला.त्यांच्या बाबतीत मी पाहिलेले अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामधून त्यांचा साधेपणा दिसून येतो.त्यांच्या मुलाच्या म्हणजेच माझा भाचा रणजित  यांच्या लग्नात देखील ज्यावेळी सामान्य लोक जेवण करत होते त्यावेळी  जेवण झालं का नाही त्याची आपुलकीने विचारपूस करणारा माणूस मी त्यांच्या रूपाने पाहिला. सामान्य माणसाला हवं असतं काय तर आपल्या नेत्यांना आपल्याकडे लक्ष द्यावं त्याची ख्याली खुशाली विचारावी ते काम तात्या नेहमीच करत असत.

तात्यांनी अनेक आजारांवर मात केली होती त्यामुळे आता ते ठणठणीत बरी होऊन जनतेत मिसळले होते. त्यामुळे कार्यकर्ते देखील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उत्साहीत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर तर दुःख कोसळले आहेच मात्र त्यासोबतच भूम परंडा वाशी या तीन तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांची अंत्ययात्रा पाहत असताना त्यांच्या लोकप्रियतेची चुणूक दिसून येत होती आणि एक सामान्य माणसं,बायका,लहान मुलं हे देखील त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते व  गहिवरून रडत होते. यावरून ते या भागात किती लोकप्रिय होते हेच दिसून येते. माणूस एखाद्या मोठ्या पदावर बसला की त्याच्यामध्ये अहंभाव येतो मात्र तात्या हे दोन वेळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून देखील सामान्य माणसाशी त्यांचं असलेलं नातं कधीही तुटलं नाही. कोणत्याही गावात गेलं तरी फाटका तुटका कार्यकर्ता असला तरी देखील तोच आपला आहे हे समजून त्यालाच त्यांनी बळ व ताकद देण्याची भूमिका कायम घेतली. आजही त्यांच्याशी कनेक्टेड असलेला कार्यकर्ता हा सामान्य जरी असला तरी तो एकनिष्ठ असायचा. तात्या हे सामान्य व्यक्ती असताना आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी अनेक नगरसेवक,नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती सदस्य,सभापती अशा अनेक मोठमोठ्या पदावर अनेक सामान्य कार्यकर्त्यांना बसवून आपण ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीची जाण ठेवत कार्यकर्त्यांना देखील संधी दिली.कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने कोणत्याही नेत्याचा आधार असतो हे त्यांना उमगले होते म्हणूनच त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांचा संपर्क कधीही तुटू दिला नाही.अशा या लोकनेत्यास आमच्या परिवाराच्यावतीने आमच्या शिक्षण समूहाच्या वतीने विनम्र अभिवादन


 
Top