धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील टप्पा क्रमांक दोनचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाणी तुळजापूरच्या रामदरा तलावात पोहोचेल. महायुती सरकारमुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. ठाकरे सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात निधी उपलब्ध करून दिला असता, तर एव्हाना हे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचले असते. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजकीय ताकद पणाला लावून मंजूर केलेल्या या प्रकल्पाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील सिंदफळ ते रामदरा या टप्पा क्र. 5 च्या कामाची माध्यम प्रतिनिधींसमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या प्रगतीबाबत उपस्थित पत्रकारांना माहिती दिली.
मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प ऑगस्ट 2001 साली डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मोठी राजकीय ताकद लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राधान्याने मंजूर करून घेतला. मध्यंतरीच्या काळात या प्रकल्पासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ शकले नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प रखडला. राज्यात सत्तांतर झाले आणि महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 11 हजार 726 कोटी रूपयांच्या सुधारीत खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे योजना क्र. 2 अंतर्गत स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत आदी कामांची योजनानिहाय एकत्रित निविदा प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली आणि आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्थापत्य - 81%, विद्युत - 80% आणि यांत्रिकी घटकांची कामे 65% तर भूसंपादनाचे काम 95% पूर्ण झाले आहे.जलसंपदा विभागाने या टप्प्यांची यशस्वी चाचणी करण्याच्या अनुषंगाने उर्वरित कामेही पुढील काही दिवसांत पूर्ण करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर अनेक दिवसांचे आपले स्वप्न साकार होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचे पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पोहोचणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी नितीन काळे, संतोष बोबडे, नारायण नन्ननवरे, चित्तरंजन सरडे यांच्यासह शेतकरी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
वाद-विवाद
शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी 7 टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन पाहण्यासाठी पत्रकार दौरा आयोजित करण्यात आला होता. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ पंप हाऊस येथे गेल्यानंतर सिंचन विभागाचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील माहिती देण्यासाठी उभारले असता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी भूसंपादनाचे शेतकऱ्यांचे पैसे न देता व अर्धवट कामाचे उद्घाटन कसे काय करता,? लोकप्रतिनिधी म्हणून खासदार, आमदार यांना का बोलावले नाही? असा प्रश्न उपस्थित करून, 21 टीएमसी पाण्यास प्रशासकीय मान्यता असताना 7 टीएमसी पाणी का उचलता? असाही प्रश्न उपस्थित केला. यानंतर धीरज पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली.