तुळजापूर (प्रतिनिधी)- 'आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो' च्या जयघोषात चालत आलेल्या सुमारे सात लाख भाविकांनी अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवी दर्शन घेऊन देविचरणी पोर्णिमा वारीसेवा केली. भाविकांच्या अलोट उपस्थितीत सोलापूरच्या काठ्यासमवेत अश्विनी पौर्णिमेचा छबिना काढण्यात आल्या. नंतर महंत तुकोजीबुवा यांनी मंदिरात जोगवा मागितल्या नंतर या शारदीय नवराञोत्सवाची सांगता उत्साहात झाली. नवराञोत्सव पंधरा दिवसाचा काळात सुमारे पंधरा लाख भाविकांनी देवी दर्शनाचा लाभ घेतला.
गुरुवारी दि. 17 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.15 वाजता चरणतिर्थ होवुन श्री देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावर 'आई अंबे उदो, उदो.. च्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली. नंतर देविजीस दही अभिषेक, पूजा होऊन नित्योपचार पूजा करण्यात आली. सकाळी सहा वाजता देविजीस भाविकांच्या दहीदुध, पंचामृत अभिषेकपुजा सुरु झाल्या. त्या संपल्यानंतर देविमुर्ती स्वच्छ करुन देविस वस्त्रालंकार (सुवर्णाचे) घालण्यात येऊन धुपारती करण्यात आली. नंतर अंगारा
काढण्यात आला. रात्री अभिषेक, पूजा संपल्यानंतर सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या मातेच्या काट्यासमवेत देवीचा छबिना मंदिर प्रांगणात विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात, पोताच्या उजेडात हा वर्षांतील सर्वात मोठा मानाचा छबिना काढण्यात आला.
बुधवारी रात्रीपासून लाखोचा संखेने भाविक पावासाची तमा न बाळगता तुळजापूर नगरीत दाखल होत होते. दिवसभर सर्व रस्ते देवी भक्तांनी फुलून 'जय भवानी जय शिवाजी' या घोषाने गर्जून गेले होते. आज काहींनी कळस दर्शन, मुख दर्शन तर काहींनी धर्म दर्शन घेतले. आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी मनोभावे अभिषेक, साडीचोळी औटभरण, गोधळ, खण, नारळ, ओटी, दंडवत गोंधळ आदी धार्मिक विधी केले. आज सर्व दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. देवी दर्शनानंतर भाविक चालत आल्याने सुजलेल्या पायांची ठणक विसरून समाधानाने गावी परत गेले.