धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नगरपालिकेत मागील सहा ते सात वर्षात झालेल्या विविध आठ घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. विधान परिषदेतील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मागणी लावून धरल्यानंतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. 

नगरपालिकेत विविध घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. तसेच काही चौकशी अहवालात कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये काही तत्कालीन प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

या अनुषंगाने आमदार धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यांनी यासंदर्भात विधी मंडळाच्या अधिवेशनातही प्रश्न विचारले होते. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी एसआयटी गठीत केली आहे. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक हसन यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचा समितीत समावेश आहे. समिती तयार केल्यासंदर्भात 9 ऑक्टोबरला ऑर्डर काढली. 

 
Top