तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव घटस्थापनेसाठी लागणारे श्रीफळ श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरातुन भोगीपुजा करुन नेण्यासाठी मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच सध्या महाराष्ट्रातील विविध भागातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे देवी प्रतिष्ठापनेसाठी लागणारे श्रीफळ व भवानी ज्योत मंदिरातुन प्रज्वलित करून नेण्यासाठी युवा वर्ग मोठ्या संखेने दाखल होत आहे. कर्नाटकातील भाविक व नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुळजाई नगरी गजबजुन गेली आहे.
कर्नाटकातील भाविक भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेणारी मंडळी राञी येवुन पहाटे देविजीच्या पुजेचे श्रीफळ व भवानी ज्योत प्रज्वलन करुन गावी परतत आहे. या दोन्ही वर्गातील भाविकांचा ओघ सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातील भाविक पितृपक्ष पंधरवाड्यात पुजाअर्चा करणे वर्ज समजत असल्याने या कालावधीत महाराष्ट्रातील भाविक संख्या घटलेली असते.
मंदिर पहाटे एक वाजता दर्शनार्थ खुले होणार
शारदीय नवरात्र निमित्ताने निमित्त दिनांक 01 ऑक्टोबर ते 02 ऑक्टोबर 2024 रोजी भवानी ज्योत असल्याने व दिनांक 03 ऑक्टोबर 2024 ते 13 ऑक्टोबर 2024 नवरात्र महोत्सव कालावधी व दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते 18 ऑक्टोबर 2024 अश्विन पौर्णिमा व दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी पासून महिन्याचे प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा रोजी सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1.00 वाजता होऊन पुजेची घाट व अभिषेक सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 वाजता या वेळेत संपन्न होतील. अशी माहीती मंदीर प्रशासनाने दिली.
घाटशिळ मार्ग दर्शनार्थ भाविकांना सोडणार
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता. भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रौ 12 वाजेपासून दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत भाविकांना घाटशीळ रोड पार्कींग येथून बिडकर पायऱ्यामार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.