धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणूकीच्या अनुषंगाने भरारी पथके तात्काळ गठीत करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर एक खिडकी योजनेतून उमेदवारांच्या प्रचार विषयक बाबींना मंजुरी व परवानगी देण्यात येणार आहे.मागील विधानसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले.या निवडणुकीत 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.तसेच राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांनी देखील सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.हा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 ची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण 14 लक्ष 2 हजार 325 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली. बुधवारी 20 नोव्हेंबर 2024 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात मतदान होणार असल्याचे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले, जिल्हयातील 240 - उमरगा (अनुसूचित जाती राखीव), 241-तुळजापूर,242-उस्मानाबाद आणि 243 -परंडा या विधानसभा मतदारसंघात याच दिवशी मतदान होणार आहे. जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघात 1523 मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे सांगून डॉ ओंबासे म्हणाले, यामध्ये उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा मतदान केंद्राचा समावेश आहे.
निवडणूकीसाठी लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन केले आहे असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले,मतदारांना 29 ऑक्टोबरपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी करता येईल.विविध अँपचा उपयोग निवडणूक यंत्रणांना आणि उमेदवारांना निवडणूकविषयक कामासाठी करता येणार आहे.जिल्ह्यात 6 क्रिटिकल मतदान केंद्र आहे.मतदारांना त्यांचे कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे याची माहिती असलेली चिट्ठी (स्लिप) ही मतदानाच्या 3 ते 4 दिवस अगोदर मतदाराला देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी यावेळी सांगितले.
उमरगा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 65 हजार 774 पुरुष,1 लक्ष 48 हजार 906 स्त्री,9 तृतीयपंथी आणि भारतीय सैन्य दलात जिल्ह्यातील कार्यरत असलेले 674 मतदार असे एकूण 3 लक्ष 15 हजार 333 मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 554 पुरुष, 1 लक्ष 81 हजार 290 स्त्री,7 तृतीयपंथी व भारतीय सैन्यतील 616 मतदार असे एकूण 3 लक्ष 82 हजार 467 मतदार,उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 95 हजार 838 पुरुष,1 लक्ष 77 हजार 638 स्त्री,17 तृतीयपंथी व भारतीय सैन्यातील असलेले 630 मतदार असे एकूण 3 लक्ष 74 हजार 123 मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 74 हजार 761 पुरुष,1 लक्ष 54 हजार 836 स्त्री,6 तृतीयपंथी आणि 799 भारतीय सैन्यात असलेले जिल्हयातील मतदार असे एकूण 3 लक्ष 30 हजार 402 मतदार असे एकूण 14 लक्ष 2 हजार 325 मतदार मतदानांचा हक्क बजावणार असल्याचे डॉ.ओंबासे यांनी सांगितले.
डॉ. ओंबासे पुढे म्हणाले की,20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी जिल्हयातील /उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा विधानसभा मतदारसंघात 1523 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.यामध्ये 7 लक्ष 36 हजार 897 पुरुष,6 लक्ष 62 हजार 670 स्त्री,39 तृतीयपंथी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जिल्हयातील 2719 मतदार असे एकूण 14 लक्ष 2 हजार 325 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.