कळंब (प्रतिनिधी)- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण पूज्य सानेगुरुजी यांनी समाजाला दिली. हे विचार घेऊन दत्तात्रय कमलाकराव कुलकर्णी (डी.के.) सर यांनी तहयात कार्य केले. त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व्हावेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती व समाज बांधिलकी निर्माण व्हावी, यासाठी आपल्या वाणीतून व कार्यातून आदर्श निर्माण केला. यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. तर विद्याभवन हायस्कूल कळंब येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी समर्पित केले. ज्येष्ठांच्या जीवनात आनंद रहावा यासाठी कार्य केले. विद्यार्थी,शिक्षक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योगदान देणाऱ्या डी.के. सरांचे 14 ऑक्टोबर रोजी निधन झाले. सरांनी आयुष्यभर चांगले विचार पेरले. त्यांचा वृक्षारोपण चळवळीत मोठा सहभाग होता. त्यांचे बंधू जयवंतराव कुलकर्णी व मुलगा डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी मृत्यू नंतर आपली रक्षा नदी जलाशयात विसर्जित न करता शेतामध्ये विसर्जित करावी अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी त्यांची रक्षा त्यांच्या देव धानोरा तालुका कळंब येथील शेतात विसर्जित करण्यात आली व या रक्षेमध्ये त्यांचा नातू वेदांत गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते आम्रवृक्षाचे झाड लावण्यात आले. सरांच्या रक्षेमध्ये नातवाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आपण समाजाचं देणं लागतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पुढील पिढीसाठी, समाजासाठी आपण समर्पित असावं हा संदेश यातून मिळत राहील. या रक्षाविसर्जन व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हभप. महादेव महाराज आडसूळ, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर रमेश जाधवर, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, नागरिक महासंघाचे माधवसिंग राजपूत, एड. एस. एम. कुलकर्णी, हेमंत रामढवे, किरण जोगदंड, बोंदर नाना, सुरज सातव कुटुंबीय जयवंतराव कुलकर्णी, वामनराव कुलकर्णी, शामराव व्यास, कौस्तुभ ईटकुरकर, गोपाळ कुलकर्णी, यांच्यासह कळंब व देव धानोरा येथील नागरिकांची उपस्थिती होती.