धाराशिव (प्रतिनिधी)- चॉकलेट व बिस्किटचे आमिष दाखवून चार अल्पवयीन मुलींवर शेतात नेत अत्याचार करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील 60 वर्षीय नराधमाला न्यायालयाने पाच वर्षाचा कारावास व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
तुळजापूर तालुक्यातील एका गात घरासमोर गजग्यांचा खेळ खेळणाऱ्या चार मुलींना गावातील तानाजी बाबुराव आगलावे (गुन्हा करताना वय 55) याने चॉकलेट व बिस्किटचे आमिष दाखवून दुचाकीवरून शेतात नेत अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास चौघींनाही विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. असा प्रकार दोन वेळा केल्यानंतर एक मुलगी भीतीने रडत असताना आई -वडिलांच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली. या प्रकरणी 7 मार्च 2020 मध्ये संबंधित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक एस. एल. जमदाडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुरूवातीला तत्कालीन अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगताप, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धारून जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी आरोपीला दोषी धरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 5 वर्षे कारावसाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद महत्वाचा ठरला.