धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सहकार क्षेत्र प्रस्थापितांनी उध्वस्त केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. विशेष म्हणजे प्रस्थापितांनी स्वतः व फक्त त्यांच्याच नातेवाईकांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा स्वाहाकार करण्याचे काम केले आहे. तर रूपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार व शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली व निभावत आहे. त्यामुळे मला तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्र पुनर्जीवित करणार असल्याची ठाम ग्वाही रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड यांनी दि.1 ऑक्टोबर रोजी दिली.
धाराशिव तालुक्यातील चिखली पाटी येथील सभागृहात रूपामाता नॅचरल शुगर युनिट क्रमांक 1 च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक परिसंवाद व भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मृदा शास्त्रज्ञ डॉ समाधान सुरवसे, प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे, रांजणी येथील एन.साई कारखान्याचे संचालक तथा कृषिभूषण पांडुरंग आवाड, हभप बाबुराव पुजारी, मधुकरराव तावडे, दत्ता सोनटक्के, संजय दळवे, बालाजी भोसले, पिरसाब शेख, लिंबराज साळुंके, महादेव साळुंके, रामदास गुंड, विनोद बाकले, व्यंकट शिंदे, पांडुरंग राजगुरु, व्यंकट मरगने गुरुजी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड गुंड म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक, सहकारी सूतगिरणी, सहकारी जिल्हा दूध संघ व सहकारी साखर कारखाने आदी शेतकरी व सभासदांच्या मालकीचे राहीले नाहीत. तर ते उध्वस्त करून संपूर्ण सहकार क्षेत्र आतापर्यंतच्या प्रस्थापितांनी उध्वस्त केले. ही अवस्था जिल्ह्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केली असल्याचा घणाघात केला. उलट पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असून तो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असल्याचे सांगत आपली अवस्था येथील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केली असल्याचा घनाघाती आरोप जिल्ह्यातील आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांवर केला. तसेच रूपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून चालविलेला सहकार नफ्यात चालतो. मात्र येथील प्रस्थापितांनी शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सहकार उद्योग तोट्यात दाखवून नातेवाईकांच्या मदतीने सहकाराचा स्वाहाकार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. येथील युवकांना हाताला काम नसल्यामुळे ते उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणी स्थलांतर करीत असून ही दुर्दैवी वेळ त्यांच्यावर प्रस्थापितांनी आणली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रूपामाता बँक, साखर कारखाना, दूध डेअरी या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा त्यांच्या ऊसाला योग्य भाव व हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे शाश्वत काम केले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत होता. मात्र रूपामाता कारखान्याच्या माध्यमातून कारखानदारीची मक्तेदारी मोडून काढण्याचे काम रुपामाता समुहाने केले असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली तर या भागातील शेतकरी, सामान्य व गोरगरिबांना नक्की न्याय देईन. तसेच जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्र पुन्हा पुनर्जीवित केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समाधान डॉ सुरवसे म्हणाले की, ऊस शेतीसाठी निचरा होणारी व सुपीक जमीन असणे अत्यंत आवश्यक असते. जेवढा सेंद्रिय खत जास्त तेवढी सुपीकता जास्त तयार होत असल्यामुळे उत्पादन देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब जेवढा जास्त असेल तेवढी रासायनिक खते पचविण्याची शक्ती जास्त तयार होत असते असे सांगत शेतकऱ्यांनी पाचट जाळण्याऐवजी ते तसेच कुजवावे असे आवाहन त्यांनी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीस कोणते घटक आवश्यक आहेत ? हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे (एनपीके) नत्र, स्फुरद व पालाश याचे योग्य प्रमाण देता येतात. विशेष म्हणजे रासायनिक खतांमध्ये सेंद्रियखतांचे मिश्रण केल्यास दिलेले घटक विकास लागू होऊन एकरी 100 टन उसाचे उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर पांडुरंग आवाड म्हणाले की, शेतकऱ्यांनी उसाच्या सरीमध्ये 5 फूटाचे ठेवणे आवश्यक आहे. तसेच एका चौरस फूटामध्ये फक्त एकच ऊस जिवंत राहत असल्याने कारखान्यापर्यंत एकरी फक्त 40 हजार ऊस जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पाणी, रोग कीड, जमिनीची सुपीकता, लागवड व बियाणे याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असून ऑक्टोबरमध्ये उसाची लागण केल्यास उगवण शक्ती चांगली होते. शास्त्रानुसार ऊस हे सूर्यप्रकाशावर येणारे पीक असून जेवढा सूर्यप्रकाश उसाच्या पानावर असेल तेवढे उसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे उसाची लागवड करताना दोन डोळ्यांमधील अंतर हे नऊ (9) इंच ठेवावे. उसाचे पाचट तसेच ठेवल्यास पावसाळ्यामध्ये गांडूळ मोठ्या प्रमाणात तयार होऊन जमीन आपोआप नैसर्गिकरित्या भुसभुशीत तर होतेच. शिवाय खुरपणीचा खर्च टळण्यासह जमिनीला एअर कंडिशन करण्याचे काम या पाचटाच्या माध्यमातून होत आहे. तसेच त्यापासून चार ते साडेचार टन सेंद्रिय खत आपोआप तयार होत असल्यामुळे भविष्यामध्ये एकाही शेतकऱ्यांने उसाचे पाचट जाळू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सत्यवान सूर्यवंशी यांनी वयामानानुसार पिकाला पाणी व खते दिली पाहिजेत असे आवाहन करून पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. मजुरीचा प्रश्न मिटवायचा असेल तर स्वतः शेतकऱ्यांनी काम करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रीय शिवशाहीर बंडू खराटे यांनी पोवाडा सादरीकरण करून ॲड व्यंकटराव गुंड यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास पर्वाची महती उपस्थितांना आपल्या शाहिरी व पहाडी आवाजात ऐकवली. प्रारंभी तुळजाभवानी माता व रुपामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी व उपस्थितांचे आभार गजानन पाटील यांनी मानले. यावेळी ऊस उत्पादक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.