धाराशिव (प्रतिनिधी) -पुणे शहरात ओबसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना 30 सप्टेंबर रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यासोबत गैरवर्तवून करण्यात आली. उद्या हा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो. त्यामुळे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह सर्व ओबीसी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे निवदनाद्वारे ओबीसी नेत्या डॉ.स्नेहा सोनकाटे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. ओबीसी, भटक्या, विमुक्त अशा 400 जातींचा पाठिंबा या आंदोलनाला आहे. अशात हे आंदोलन दडपण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. झुंडशाहीचा वापर केला जातो आहे.
आज घडीला झुंडशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष सुरु आहे. आंदोलन करणे, आपली बाजू मांडणे, संविधानिक प्रक्रियेत राहून न्याय हक्क मिळवणे हा अधिकार नागरिकांना संविधानातून मिळालेला आहे. देशात संविधानाहून, कायद्याहून कुणीही मोठं नाही. मात्र, राजकीय वरदहस्त असलेले कार्यकर्ते असा टोकाचा संघर्ष करुन महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्राध्यपक लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेतृत्त्व करतात. त्यांचं खच्चीकरण करुन चळवळ संपवण्याचे प्रयत्न सुरुयेत. ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. लोकशाहीचे रक्षक म्हणून या आंदोलनाला, उपेक्षित, वंचित समाजाच्या अभिव्यक्तीला संरक्षण देणे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे करण्यात आली. या निवेदनावर ओबीसी नेत्या डॉ.स्नेहा सोनकाटे, हरिदास शिंदे, मिलिंद चांदणे, रवी कोरे, राजाभाऊ माळी, अरुण डोलारे , सरफराज पटेल , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.