धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुका विकासापासून वंचित असून आई तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहीन. तसेच या भागातील अत्यावश्यक विकास साधण्याबरोबरच सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम व शेतकऱ्यांना शेतीपूरक लघु उद्योग उभारून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणार आहे. त्यामुळेच या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच मी आगामी तुळजापूर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड.व्यंकटराव गुंड यांनी दि.6 ऑक्टोबर रोजी केले.
तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील दिग्विजय एंटरप्राइजेस गुळ कारखान्याच्या 2024 चे रोलर पूजन व ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, गुळ कारखान्याचे चेअरमन विक्रम सुरवसे, माजी सरपंच मधुकरराव सुरवसे, शिवसेना तालुका प्रमुख कृष्णांत मोरे, शिवसेना विस्तारक प्रदीप रोचकरी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख गणेश जगताप, अंकुश पाटील, शिवसेना शहरप्रमुख (उबाठा) संतोष पुदाले, रामदास गुंड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड गुंड म्हणाले की, मुर्टा येथील या गूळ कारखान्याच्या माध्यमातून नळदुर्ग व परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव व युवकांच्या हाताला काम देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील मोडीत निघालेले सहकार क्षेत्राचे पुनर्जीवन करणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांनी ऊस लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन इटकरी यांनी व उपस्थितांचे आभार प्रदीप कदम यांनी मानले. या कार्यक्रमास रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड-पाटील, अंकुशराव पाटील, संदिप गुंड, शंकर गाडे, सरदारसिंह राठोड, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब जगताप, राजेंद्र कदम, गणेश खराडे आदींसह या भागातील ऊस उत्पादक शेतकरी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.