धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रसंत गाडगेबाबा हे दिवस उगवण्यापूर्वी संपूर्ण गाव स्वच्छ करून बिन बोभाटपणे जात होते. मात्र आता देशात स्वच्छ अभियान राबविण्याच्या माध्यमातून हातामध्ये झाडू धरून फोटो काढण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. त्यामुळे अशा गलिच्छ मनोवृत्तीच्या राजकीय लोकांना स्वच्छ करायला पाहिजे असे आवाहन करीत केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विचारवंत ॲड असीम सरोदे यांनी दि.५ सप्टेंबर रोजी निशाणा साधला. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रातील मतांवर डोळा ठेवून असंविधानिकपणे ‌मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील १४ हजार मराठी शाळा बंद केल्या असून या दर्जाचा कोणाला उपयोग होणार असा हल्ला त्यांनी चढविला.

धाराशिव शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात द्वेषमुक्त समाज आणि माणुसकीच्या नात्यासाठी दडपशाहीच्या विरोधात, लोकशाही रक्षणासाठी, सत्य ऐकायला या... लोकशाहीचे पांघरून घेतलेली हुकूमशाही.. आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलताना ॲड सरोदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे लोकशाहीचे विचार समजून घ्यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज पासून ते समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संविधानाची हत्या करण्याच्या मानसिकतेचे आहेत. तसेच सध्या सर्वत्र कट्टरतावादी सर्वत्र फोफावत असून हे देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. तर राज्यामध्ये गायीवरून राजकारण सुरू असून गो सेवा व गो रक्षा हा विषय वेगळा असल्याचे सांगत गो रक्षा ज्या ठिकाणी येते तेथे राजकारण येत  असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. एकीकडे सत्ताधारी मंडळी गायींना अनुदान देतात तर दुसरीकडे मुला-मुलींना अन्न मिळत नसल्यामुळे ते कुपोषित होऊन मरत आहेत.मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला या मंडळींना वेळ नसल्याची जहरी टिका ही त्यांनी केली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण,आरोग्य, हवा व पाणी याच्यावर तुम्ही लक्ष देणार आहात की नाही ? असा प्रश्न विचारत नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.भारतातील सगळ्या समूहाला सामूहिक ओळख देण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले असून त्यांचे उपकारच मानले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकीकडे संविधानाचा जागर करण्याची भाषा करणारी सत्ताधारी मंडळी संविधान प्रक्रिया न राबविताच ३७० कलम रद्द करण्यासह पुलवामा हल्ला देखील घडवून आणतात असा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा अशी घोषणा दिली होती. तर मोदी यांनी तुम मुझे चंदा दो, मै तुम्हे धंदा दूंगा असे उद्योग चालविले असल्याचा टोला त्यांनी लगावला. बदलापूर घटना प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर म्हणजे संविधानाचा एन्काऊंटर पर्यायाने महाराष्ट्रातील सर्व मुलींचे गुन्हेगार देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोदी व शहा हे संविधानाची तोडफोड करीत असून संपूर्ण देशामध्ये अराजकता माजविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत असल्याची तोफ त्यांनी डागली. यावेळी ॲड श्रेया आवले यांनी आपले विचार व्यक्त केले.  प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी व उपस्थितांचे आभार सोमनाथ गुरव यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वोट जिहाद प्रकरणी फडणीसावर कारवाई करा

नुकताच कोल्हापूर येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम वोट जिहाद असे बोलून मुस्लिम समाजाचा अवमान केला आहे. तर लोकसभा निवडणुकी प्रचार दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच वेळेस या शब्दाचा प्रयोग करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आचारसंहिता लागल्यानंतर जर फडणवीस किंवा इतरांनी वोट जिहाद या शब्दाचा प्रयोग केला तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 
Top