धाराशिव (प्रतिनिधी)- संकटात सापडलेल्या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार 9421211211 या हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील महिलांना या क्रमांकाच्या माध्यमातून मिळणार आहे. सरकारी यंत्रणेमार्फत त्रस्त महिलेला तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र कटिबध्द असेल, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
गुरूवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेचे औचित्य साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र या हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे बोधचिन्ह व 9421211211 या हेल्पलाईन क्रमांकाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्येष्ठ लेखिका कमलताई नलावडे, प्रांजल शिंदे,नंदाताई पुनगुडे,ॲड. मैना भोसले, ॲड. दीपाली जहागीरदार, ॲड. सुजाता माळी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेला मोठे महत्व आहे.आजही महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठा प्रश्न आहे.महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी,त्यांची सोय व्हावीसाठी आणि त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी हेल्पलाईनची अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रांजल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय योजनांमार्फत महिला केंद्रीत उपक्रम राबवून माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याबाबत अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रियंका माळी, संध्या पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय मैंदर्गीकर यांनी केले. तर आभार तेरणा रेडीओचे कार्यक्रम व्यवस्थापक रमेश पेठे यांनी मानले. यावेळी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.