धाराशिव (प्रतिनिधी)- माता-भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून 'तेरणा स्त्री शक्ती केंद्र“ या अभिनव उपक्रमास प्रारंभ होत आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने मातृशक्तीच्या सन्मान आणि सुरक्षेच्या संकल्पाची घटस्थापना केली जाणार आहे. जिल्ह्यातील माता-भगिनींच्या अडीअडचणीचे निराकरण 'तेरणा स्त्री शक्ती केंद्र“ या उपक्रमांतर्गत महिला कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
माता-भगिनींशी निगडीत असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी'तेरणा स्त्री शक्ती केंद्र“ या उपक्रमांतर्गत फक्त महिलांसाठी महिलांनी चालवलेले कॉल सेंटर सुरू करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना आमदार पाटील यांनी हाती घेतली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेचे औचित्य साधत मातृशक्तीच्या आधार व सन्मानाची अनोखी घटस्थापना केली जाणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील,पोलीस निरीक्षक हिना शेख, ज्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली, अशा सामाजिक कार्यकर्त्या कोमल कुंभार, श्रीमती कमलताई नलावडे यांच्यासह महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य दीपाली जहागीरदार व तृप्ती भोसले यावेळी उपस्थित राहणार आहेत.