तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी (दि. 03) प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने तुळजाई नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 

श्री तुळजाभवानी देवी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर बॅरिकेटींग उभारण्यात आले आहे. सुरक्षेच्या अनुषंगानेही विविध उपाययोजना राबविण्यात येत असून भाविकांची कडक तपासणी करुन घाटशिळ रोड मार्ग  मंदिरात सोडले जात आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर तुळजापूर शहरात प्रशासनाकडुन जोरदार तयारी करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालतो. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनासा भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने व आगामी विधानसभा सभा निवडणुक पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. तुळजापूर शहरातील व्यापारी, पुजारी, स्थानिक  नागरिक, भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडून बुधवारी सकाळी चार वाजेपर्यंत शहरात येणारी मोठी वाहने पुर्णतः बंद करण्यात आली. नवरात्र महोत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी मंदिर सलग 22 तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांना स्नानासाठी घाटशिळ दर्शन मंडप शेजारी बांधण्यात आलेले तीर्थकुंड मंगळवारपासून खुले करण्यात आले आहे. 

भाविकांच्या दर्शनानंतर मंदिराबाहेर पडण्यासाठी मातंगी देवी मंदीर समोरून व निंबाळकर दरवाजा मार्ग खुला करण्यात आला आहे. घाटशीळ, रोड दर्शन मंडपातून दर्शन, अभिषेक पुजेसाठी सोडण्यात येणार आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने बुधवारी  भवानी ज्योत घेवुन जाण्यासाठी येथे दाखल झाले होते. वर्षानुवर्ष भवानी मंदिरात ज्योत प्रज्वलित करुन नेणाऱ्या मंडळाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव चालु होण्यापूर्वीच ज्योत नेणाऱ्या भक्तांची तुळजाई नगरीत गर्दी होत आहे.


गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12.00 वाजता घटस्थापना, ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्रौ छबीना. शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर रोजी श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना. शनिवार  दि. 5 ऑक्टोबर रोजी श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना. रविवार दि. 6 श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना. सोमवार दि. 7 श्री देविजींची नित्योपचार पुजा, “ललिता पंचमी“ रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. मंगळवार दि. 08 श्री देवीजींची नित्योपचार पुजा, मुरली अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. बुधवार दि. 09 श्री देविजींची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. गुरुवार दि. 10 श्री देविजींची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. शुक्रवार दि. 11 दुर्गाष्टमी, श्री देविजींची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा व सकाळी 7.00 वाजता होम व हवनास आरंभ. दुपारी 12.15 वाजता पुर्णाहुती व रात्रौ छबीना. शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी श्री देविजींची नित्योपचार पुजा, दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन,

विजया दशमी (दसरा) सार्वत्रिक सिमोल्लंघन, रात्रौ नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक, रविवार दि. 13 उषःकाली श्री देविजींचे शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमी पुजन. बुधवार दि 16 ऑक्टोबर रोजी “कोजागिरी पौर्णिमा. गुरुवार दि. 17 (मंदीर पोर्णिमा) पहाटे श्री देविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा. (मंदीर पोर्णिमा) शुक्रवार दि. 18 श्री देविजींची नित्योपचार पुजा अन्नदान महाप्रसाद व रात्रौ सोलापूरच्या काठ्यांसह छबीना.

 
Top