धाराशिव  (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी धाराशिव येथे माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे हे आहेत. निवडणूकीच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे डॉ.ओंबासे यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अपर जिल्हाधिकारी यांची कोर्ट रूम येथे माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.याच कक्षात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या फ्लेक्सवरील जाहिरात,पॅम्प्लेट्स व वॉलपेपरवरील राजकीय जाहिरातीच्या मजकुराचे प्रमाणीकरण निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडून करून घ्यावे.तर दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, सिनेमा हॉल, रेडिओ, खाजगी व सार्वजनिक एफएम रेडिओ,सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या द्रुक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस,रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस,सोशल मीडिया,इंटरनेट व संकेतस्थळे यावर दाखविण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले.

राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे.या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस,रेकॉर्ड केलेले व्हॉईस मेसेजेस,सोशल मीडिया,इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती ह्या देखील जाहिरात प्रसारित होण्याच्या 48 तास अगोदर राजकीय पक्ष,उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करावा. माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.


 
Top