धाराशिव (प्रतिनिधी) - आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार एम.एम. शेख व प्रदेश सरचिटणीस मोईज शेख यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी बैठकीत केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन या समाजाचे प्रतिनिधी विधान सभेमध्ये पाठवावेत, अशी मागणी समाज बांधवांच्यावतीने एका शिष्टमंडळाने केली आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या विधान सभेच्या निवडणुकीचे जोरदार वारे चालू झाले असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) या पक्षांच्या महविकास आघाडीला मुस्लिम समाजाने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) या पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे मुस्लिममुक्त विधानसभेची निवडणूक या बाबींचा विचार करता या निवडणूकीत मुस्लिम बहुल क्षेत्रात मुस्लिम उमेदवारास संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लातूर येथे धाराशिव येथील काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळाने भेट घेऊन ही मागणी केली. तर मागील महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना देखील संयुक्त शिष्टमंडळ भेटले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या कोट्यातून मुस्लिम समाजाला 20 जागा देण्याचे आश्वासन दिले होते.

 परंतू दगा फटका बसू नये यासाठी जोपर्यंत उमेदवार यादी जाहीर होत नाही. तोपर्यंत कायम दबाव ठेवण्यासाठी एक संघ लढा देत रहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याच धर्तीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार संस्थांमधील निवडणुकीत देखील मुस्लिम समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करीत रहायचे असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद खलील, नदेरुल्लाह हुसेणी, अयुब पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसूद शेख, शिवसेनेचे अफरोज पिरजादे, सोलापूरचे माजी महापौर आरिफ शेख, ज्येष्ठ नेते शकील मौलवी, नवाज अख्तर काझी आदी उपस्थित होते.

 
Top