धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. मी गेल्या 46 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझा जिल्हाध्यक्ष व जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात तसेच तुळजापूर मतदार संघातील सर्व गावांमध्ये जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर या मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा दावा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते विश्वास शिंदे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले व होत आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष व जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील 120 गावे व धाराशिव तालुक्यातील 72 गावांमध्ये माझा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेस पक्षासह इतर पक्षाची अनेक लोक मला भेटून तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिर संस्थानचा विकास व इतर विकासाची कामे काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक आमदार अमित देशमुख यांच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस व शिवसेना या पक्षांची महाआघाडी असून या पक्षाच्या माध्यमातून मला तिकीट मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पक्षाने तिकीट जर दिले तर मी 100 टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास ही शिंदे यांनी व्यक्त केला.


 
Top