धाराशिव (प्रतिनिधी)- गत आठवडाभरापासून परतीचा पाऊस दररोज बरसत असल्याने जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले सोयाबीनची मळणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता परतीचा पाऊस नेमा कधी विश्रांती घेणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी, बेंबळी, रूईभरसह अन्य काही ठिकाणी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले असून, दररोजच्या पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्यासह सोयाबीनचे नुकसान होत आहे. धाराशिव शहरातील बाजार समिती परिसर, आयटीआय परिसर, बस स्थानकातही पाणी साचले होते. आधीच दोन दिवसापूर्वी रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी शेतात ट्रॅक्टर, मळणी मशीन, हार्वेस्टर चालत नाही. त्यामुळे आता रब्बी पेरणीचे दिवस जवळ आले तरी अजून सोयाबीन भरडून घरी आणता आले नसल्याने दिवाळी कशी करायची? या विवंचनेत अनेक शेतकरी आहेत. परतीच्या पावसामुळे शेतशिवरात पाणी साचले असून, सध्यातरी मशागत करता येत नसल्याने शेतकरी तणनाशकाची फवाणी करताना दिसत आहेत.