धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मंगळवार दि. 22 रोजी 27 जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते. तर बुधवार दि. 23 ऑक्टोबर रोजी 31 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. यामध्ये संजय पाटील दुधगावकर, धनंजय सावंत, सुधीर पाटील, सुरज साळुंके आदींचा समावेश आहे. 

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. युतीमध्ये अन्य कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाही. युतीमधून उमेदवारी मिळविण्यासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. शिवसेना शिंदे गटातील सौ. प्रेमा सुधीर पाटील, सुधीर पाटील, सुरज साळुंके आदींनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. एका जागेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात अनेक जण इच्छुक असल्यामुळे बंडखोरी होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना ठाकरे गटाला उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाची जागा सुटली असताना देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे प्रा. सतीश मातने यांनी प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशेष म्हणजे प्रतापसिंह पाटील यांनी जरांगे पाटील यांची नुक्तीच भेट घेतली होती. 

 
Top