धाराशिव (प्रतिनिधी) - निवडणुकीच्या काळात काही मंडळी ग्रामीण भागात प्रचाराच्या बहाण्याने पर्यटन करण्यासाठी येतात. मला जर तुळजापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली तर या भागात ऊस, शेती माल व दुध आदींवर प्रक्रिया उद्योग उभा करुन शेतकऱ्यांना जोड धंदा व तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचे आश्वासन रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांनी दि.10 ऑक्टोबर रोजी केले.
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र.3 च्या 2024-25 गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन, ऊस पीक परिसंवाद व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव येथील विरक्त मठाचे श्रीमणी राजशेखर महास्वामीजी, हभप ॲड पांडुरंग लोमटे महाराज, बाबुराव पुजारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कृषिवेत्ता डॉ.गणेश पवार, प्रगतीशील शेतकरी सत्यवान सुरवसे, मुर्टा येथील गुळ पावडर कारखान्याचे चेअरमन विक्रम सुरवसे, सरपंच दत्तात्रय मस्के, उपसरपंच रामजी भोसले, किरण जाधव, नंदकुमार जाधव, नेताजी जाधव, बाळासाहेब भोसले, ॲड अजित गुंड-पाटील, विष्णू घोडके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड. गुंड म्हणाले की, लातूर हा आपल्या जिल्ह्यातील तालुका होता. तो वेगळा झाल्यानंतर तेथील नेतृत्वाने गोरगरिबांचे दुःख ओळखून बहुजनांच्या हाताला काम व त्यांची उपजीविका भागविण्याचे काम केले. लातूर येथील एमआयडीसीत ऑईल मिल, डाळ मिल व इतर कंपन्यांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच तेथील नेतृत्व हे गोरगरिबांना मदत करणारे व बहुजनांचे कल्याण करणारे असल्यामुळे त्या जिल्ह्याची प्रगती झाली आहे. मात्र आपल्या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण आपली उपजीविका भागविण्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर व इतर ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे मी गोरगरिबांच्या दुःखाचा खरीचा वाटा कुठेतरी उचलता यावा यासाठी रूपामाका बँक, दूध डेअरी व कारखाना उभा करून अनेकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना आपला माल ठेवता यावा यासाठी वेअर हाऊस देखील उभा केले असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. जर मला या भागात साखर कारखाना काढण्याची परवानगी मिळाली तर इथेनॉल उत्पादनासह तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती व तांड्यावरील दूध गोळा करून त्यापासून दुग्धजन्य पदार्थ, शेती मालांवर प्रक्रिया व आणखी दोन वेअर हाऊस उभा करून शेतकऱ्यांना जोडधंदा मिळवून देण्याबरोबरच तरुणांच्या हाताला आणखीन रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे या तालुक्याला आजपर्यंत कुठलेच नेतृत्व नीट लाभलेले नाही. तर आपण राजकीय नेतृत्व शोधायला व निवडायला कुठेतरी कमी पडलो असून यापुढे जर चांगले नेतृत्व नाही निवडले तर येणाऱ्या पाच - दहा पिढ्या आपण मागे जाणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच या भागात ठराविक ऊस कारखानदारांची ऊस तोड करण्याची मक्तेदारी होती. ती मंडळी या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याऐवजी कर्नाटकमधून ऊस आणून तो गाळप करीत होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक व हेळसांड होत होती असे सांगत ते म्हणाले की, रुपामाता शुगर कारखाना सुरू करुन ती मोडीत काढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमणी राजशेखर महास्वामीजी, डॉ गणेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे शेती अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.