धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यात धनगर समाज माझ्या पाठीशी असून मी निवडणुकीला उभा राहणार आहे. त्यामुळे आमदार राणाजगतिसिंह पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरत असून माझे व मंत्री छगन भुजबळ यांचे बॅनर तुळजापूर तालुक्यातील वागदरी व बेंबळी येथील बॅनर फाडले असल्याचा आरोप धनगर समाजाच्या नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने 73 लाख रुपये खर्च करुन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र त्याचे उद्घाटन करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे जाणून बुजून अडथळा निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप डॉ.स्नेहा सोनकाटे यांनी केला.
पुढे बोलताना डॉ. सोनकाटे म्हणाल्या की, बहुजन समाजाला सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे यासाठी राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन खासदार विकास महात्मे यांच्याकडे मांडला. खासदार महात्मे व ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून आपण स्वतः प्रयत्न करून 150 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचे डॉ. सोनकाटे यांनी सांगितले. तुळजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे निवडणुकीतील धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून भूमिपूजन करून केले असल्याचा आरोपीही डॉ. सोनकाटे यांनी केला.