नळदुर्ग (प्रतिनिधी)- राज्यसरकारने देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देऊन खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या गोमातेचा सन्मान केला आहे. लवकरच देशी गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळणार असल्याचेही महाराष्ट्र सरकारच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी नळदुर्ग येथे नवरात्र महोत्सवानिमित्त महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांनी आपल्या छातीवर घटस्थापना करून सुरु केलेल्या अनुष्ठान स्थळी भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर बोलतांना म्हटले आहे.
नळदुर्ग येथे अंबाबाई मंदिरात श्री देवीच्या मुर्तीसमोर महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे नवरात्र महोत्सवानिमित्त अन्न -पाणी तसेच सर्व विधिंचा त्याग करून एकाच आसनामध्ये आपल्या छातीवर घटस्थापना करून लोक कल्यानासाठी दि. 3 ऑक्टोबर पासुन अनुष्ठान सुरु केले आहे. हे अनुष्ठान विजयादशमीपर्यंत चालणार आहे. दि. 8 ऑक्टोबर रोजी अनुष्ठानाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी अनुष्ठानस्थळी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले त्याचबरोबर गोमातेची मुर्ती महाराजांना भेट देऊन त्यांचा सत्कार मुंदडा यांनी केला. यावेळी नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा सत्कार अजय दासकर, गणेश मोरडे, विजय ठाकुर, महेश खटके, अक्षय भोई यांनी केला.
यावेळी बोलतांना शेखर मुंदडा यांनी म्हटले की,महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांनी अन्न –पाणी तसेच सर्व नैसर्गिक विधिंचा त्याग करून आपल्या छातीवर घटस्थापना करून जे अनुष्ठान सुरु केले आहे ते अतिशय कठीण असुन हे कार्य देवीचा आशिर्वाद असल्याशिवाय होत नाही. महाराजांना देवीचा आशिर्वाद आहे म्हणुनच त्यांच्या हातुन हे कार्य घडत आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या गोसेवा आयोगाचा अध्यक्ष आहे. मला गोसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मी आतापर्यंत 3 हजार 840 गोमातेचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. देशी गाय कसायाच्या हातात जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज राज्यसरकारने देशी गाईला “राज्यमातेचा“दर्जा दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात गोहत्त्या होणार नाही.गोमातेची हत्त्या होऊ नये यासाठी गोरक्षकांनी प्रयत्न करावेत. ज्या शेतकऱ्यांना देशी गाय विकायची आहे त्यांनी ती गाय मला विकत द्यावी 24 तासाच्या आत त्यांना त्या गायीचे पैसे मिळतील. आज गोशाळा सुरु करण्यासाठी राज्यसरकार प्रत्येक गोशाळेला 25 लाख रुपयांचा निधी देत आहे. राज्यातील प्रत्येक मंदिराने गोशाळा सुरु करावी. गोमातेचे रक्षण करणे काळाची गरज असुन देशी गाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचे योगदान देते. राज्य सरकारने देशी गाईला “राज्यमातेचा“दर्जा देऊन देशी गाईचा सन्मान केला आहे. येणाऱ्या काळात लवकरच देशी गाईला “राष्ट्रमातेचा“दर्जा मिळणार असल्याचेही शेखर मुंदडा यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक संजय बताले यांनी केले. या कार्यक्रमास नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाचे माजी नगरसेवक संजय बताले,बसवराज धरणे,अजय दासकर, गणेश मोरडे, अक्षय भोई,दर्शन शेटगार, विजय डुकरे, अमर डुकरे,महेश खटके,भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे. शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शाम कनकधर, गजानन हळदे, विजय ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे यांच्यासह हिंदु समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.